(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात ब्रेक निकामी झाल्याने क्रेन रस्त्याच्या कडेला उलटून थेट खोल दरीत कोसळली. या अपघातात क्रेनचा ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी (ता. २९) सकाळी हा अपघात घडला. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मुंबई-गोवा चौपदरीकरण सध्या प्रगतिपथावर महामार्गाचे आहे. त्यासाठी मोठ्या मशिनरी तसेच मोठमोठ्या क्रेनदेखील येथे आणल्या आहेत. त्यापैकीच ठेकेदार कंपनीची एक मोठी क्रेन गुरुवारी सकाळी सावडेंच्या दिशेने जात होता. कामथे घाटात वळणावर या क्रेनचे ब्रेक निकामी झाले. ऑपरेटरला काय करावे, हे कळण्यापूर्वीच क्रेनने रस्ता सोडला ती रस्त्याच्या कडेला उलटली आणि थेट खोल दरीत कोसळली. महामार्गावर प्रचंड मोठा आवाज झाला. दोन्ही बाजूने वाहने थांबली. पोलिसदेखील तत्काळ दाखल झाले. क्रेन केबिनमध्ये ऑपरेटर अडकून पडला होता. परिसरातील तरुण, ग्रामस्थ आणि काही वाहनचालक धाडस करून खोल दरीत उतरले आणि सर्वप्रथम ऑपरेटरला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. ऑपरेटरचे दोन्ही पाय क्रेनमध्ये अडकून पडले होते. मला वाचवा, मला वाचवा…. माझे पाय गेले… असा तो सतत ओरडत होता.
मदतीसाठी दरीत उतरलेल्यानी प्रचंड मेहनत घेतली. दुसरी क्रेन मागवण्यात आली नंतर ऑपरेटरला बाहेर काढून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. ऑपरेटर परप्रांतीय असून, त्याचे नाव समजू शकलेले नाही. चिपळूण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, पुढील तपास सुरू आहे.