(गणपतीपुळे / वैभव पवार)
प्रबळ इच्छाशक्ती, दृढ आत्मविश्वास, जिद् आणि चिकाटी असेल तर ध्येय व उद्दिष्टे निश्चितपणे गाठता येतात हे सिद्ध केलय मालगुंड गावची सुकन्या असलेल्या श्रुती संजय दुर्गवळीने. श्रुतीने आपल्या आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर धावणे क्रीडा प्रकारात सध्या मालगुंड गावाचेच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव चमकवले आहे. त्यामध्ये श्रुतीने रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची स्पर्धक म्हणून सहभाग घेत मुंबई विद्यापीठाच्या मैदानात कोकण झोन टूर्नामेंट विद्यापीठीय स्पर्धेमध्ये स्टीफनचेस क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.
मुंबई युनिव्हर्सिटी मरीन लाईन येथे झालेल्या कोकण झोन आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर धावणे स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई इंटरझोनल तीन किलोमीटर स्टीफलचेस मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. कोकण झोनच्या या मोठ्या स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक प्राप्त करीत क्रॉसकंट्री या नॅशनल स्पर्धेसाठी आपली निवड प्राप्त केली आहे. ही स्पर्धा मंगळूर येथे 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे या स्पर्धेसाठी ती पुन्हा जिंकण्याच्या इर्षेने रवाना होणार आहे.
श्रुतीने यापूर्वी लांजा येथे झालेल्या इंटरझोनल क्रॉसकंट्री स्पर्धेमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून सहभागी होत पाचवा क्रमांक प्राप्त करून ऑल इंडिया युनिव्हर्सिटी क्रॉस कंट्री स्पर्धेसाठी निवड प्राप्त केली होती. तसेच परभणी येथे झालेल्या ऑल इंडिया स्पर्धेमध्ये देखील तिने विशेष क्रमांक प्राप्त केला होता. अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या श्रुतीने आपल्या आपल्या घरच्या हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतानाच मालगुंड येथील महाविद्यालयामध्ये इयत्ता बारावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर शैक्षणिक यश कायम राखतानाच आपल्या खेळातील कामगिरीची देखील चुणूक दाखवीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
श्रुतीच्या बाबतीत विशेष सांगावेसे म्हटले तर तिची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची .तिचे वडील संजय दुर्गवळी हे प्लंबिंग चे काम करतात .तर आई घरची जबाबदारी सांभाळते. तसेच तिच्या दोन बहिणीने कॉमर्समधून शिक्षण घेतले असून एक ग्रॅज्युएट आहे. तर सध्या दुसरी चाफे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तर श्रुती ही गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत असून सध्या कला शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. परंतु उच्चशिक्षण घेत असतानाच आपल्या खेळाच्या जोरावर प्रचंड मेहनत घेऊन एखादी सरकारी नोकरी करण्याची मोठी महत्वकांक्षा असल्याचा मानस श्रुती व्यक्त करते. ती पूर्णत्वास नेण्यासाठी तिची सध्या धडपड आणि कसरत सुरू आहे.
घरच्या परिस्थितीवर मात करून स्पर्धात्मक खेळाच्या जोरावर तिने रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेत असतानाच ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये आपले मोठे वर्चस्व निर्माण केले आहे .त्यामुळे सध्या रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाबरोबरच मालगुंड गावाचेच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव श्रुतीच्या चमकदार यशाने अधोरेखित झाले आहे. एकूणच मालगुंड गावासाठी ही बाब मोठी अभिमानास्पद व गौरवास्पद ठरली असून श्रुतीच्या खेळातील भरारीची विशेष दखल घेऊन मालगुंड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माजी सरपंच दीपक दुर्गवळी यांनी श्रुतीचा खास सन्मान केला होता. तसेच तिने मालगुंड महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये आपल्या कारकिर्दीत झालेल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा ही मान प्राप्त करून दिला होता. तसेच तिच्या पाठीवर कौतुकाची आणि शाबासकीची थाप देऊन तिला खेळातील यशासाठी विशेष प्रोत्साहित केले होते.
मालगुंड दुर्गवळीवाडी येथील संपूर्ण वाडी वस्तीसाठी ही बाब अभिमानास्पद ठरली असून येथील संपूर्ण गावकरी मंडळी मंडळींकडून व दुर्गादेवी नाच मंडळ आणि तरुण मंडळाकडून श्रुतीचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण मालगुंड परिसरामधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर मालगुंडचे माजी सरपंच तथा तंटामुक्त गाव समितीचे विद्यमान दीपक दुर्गवळी यांनी श्रुतीचे विशेष कौतुक करून खास अभिनंदन केले आहे.