(रत्नागिरी)
वडिलांसोबत झालेल्या भांडणामुळे घरातून निघून गेलेल्या ३३ वर्षीय विवाहितेचा मंगळवारी सकाळी पानवल धरणात मृतदेह आढळला. मालती गजेंद्र कळंबटे (रा. झरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) असे तिचे नाव असून, ती २९ सप्टेंबर रोजी घरातून निघून गेली होती. तिने धरणाच्या पाण्यात आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मालती कळंबटे ही विवाहिता मानसिक रुग्ण असून, तिचे वडीलही मानसिक रुग्ण आहेत. पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती वडिलांच्याच घरी राहत होती. रविवारी (२९ सप्टेंबर) वडिलांसोबत झालेल्या भांडणामुळे घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. याबाबत ग्रामीण पोलिस स्थानकात बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आली होती. तिचा सर्वत्र शोध सुरु असताना मंगळवारी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमाराला पानवल धरणाच्या खाली प्रवाहात तिचा मृतदेह तेथील स्थानिकांना दिसला.
याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. याबाबत ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू पोलिस करत आहेत.