(नाणीज / वार्ताहर)
‘जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द व ध्येयाची गरज असते. त्यासाठी संस्कार व नीतिमूल्ये आवश्यक असतात,’ असे मार्गदर्शन जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यानी केले. येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेमध्ये इयत्ता दहावी व बारावी या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. यावेळी आशीर्वाद देताना स्वामीजी बोलत होते.
या कार्यक्रमासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित होते. तसेच संस्थांनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर, प्रशालेचे चेअरमन अर्जुन फुले, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील व ज्येष्ठ शिक्षक कीर्तीकुमार भोसले उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रशालेचे चेअरमन अर्जुन फुले यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या, मुख्याध्यापिका अबोली पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनीदेखील शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पिठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज म्हणाले, “विद्यार्थ्यांनी भविष्यात गरुड भरारी घेण्यासाठी ही शिक्षणाची शिदोरी घेऊन पुढची वाटचाल करावी.”
परमपूज्य गुरु माता सौ. सुप्रियाताई यांनी देखील विद्यार्थ्यांविषयी असलेला मातृत्व भाव व्यक्त केला. विद्यार्थ्यांना डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे उदाहरण देत शिक्षणाचे महत्त्व किती महान आहे ते सांगितले. जगद्गुरुश्रीं पुढे म्हणाले, “विचार, आचार व संस्कार ही मानवी मूल्य जो जपतो तो खरा विद्यार्थी असतो. असे विद्यार्थी आपल्या प्रशाले मधून निर्माण व्हावेत की त्यांना एक यशस्वी व आदर्श संपन्न युवक म्हणून त्याच्याकडे सर्वांनी पहिले जावे.”
मुख्याध्यापिका व प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन इयत्ता अकरावीचा विद्यार्थी सुयश सोनकांबळे व कु. श्रेया विभुते या विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता नववीची विद्यार्थिनी ऋतुजा काटकर हिने आभार मानले.