(रत्नागिरी)
परप्रांतीय कोकणात येऊन कवडीमोलाने जमिनी खरेदी करून त्यावर आपले इमले उभारत आहे. एजंटच्या आमिषाला बळी पडून कोकणातील माणूस आपल्या वाडवडीलांनी जपलेल्या जमिनी परप्रांतीयांच्या हवाली करून स्वतः भूमिहिन होत आहे. परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. अशावेळी कोकणी माणूसही जागा होऊ लागला आहे. याची पहिली सुरूवात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून झाली आहे.
दापोली तालुक्यातील ओळगाव मधील ग्रामस्थांनी एकत्र येत कुणीही गावाबाहेरील व्यक्तीला जमीन विकायची नाही असा निर्णय घेतला असून बाहेरील व्यक्तींना जमीन खरेदी करण्यास सक्त मनाई अशा आशयाचे फलक गावात उभारून जनजागृती करण्यात आली आहे. कोकणात परप्रांतीय मोठ्या संख्येने जमिनी खरेदी करत आहेत. कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा आणि निसर्गसौंदर्यामुळे परप्रांतीयांचा कोकणातील जमिनीवर डोळा आहे. दलालांच्या माध्यमातून कोकणातील जमिनी घशात घालण्याचे डाव आखले गेले आहेत. नाणार असो किंवा बारसू यापरिसरात परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. त्याशिवाय रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य गावागावातील जमिनीची खरेदी परप्रांतीय तसेच बाहेरील मंडळींनी केलेली आहे.
ओळ गावकऱ्यांनी लावले फलक
ओळगावातील एक जमिनी बाहेरील व्यक्तीने खरेदी केल्याची कुणकुण गावकऱ्यांना लागताच गावकरी एकवटले आणि त्यांनी यापुढे गावातील जमीन परप्रांतीयांना तसेच गावाबाहेरील व्यक्तीला विकायची नाही असा कठोर निर्णय घेतला. त्या आशयाचे गावकऱ्यांनी फलकही गावात लावले आहेत. त्या फलकावर ठळक अक्षरात असे लिहिण्यात आले आहे की ओळगाव मधील जमीन बाहेरील व्यक्तीला खरेदी करण्यास सक्त मनाई आहे. हे फलक गावकऱ्यांनीच गावात लावले असल्याने कोकणाला जमिनीचे महत्व कळले असून गावकरी जागे झाल्याची चर्चा रंगली आहे. ओळगावातील ग्रामस्थ मंडळाने एकत्र येत हा कठोर निर्णय घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या जमिनी बाहेरील मढळी विकत घेतात आणि जागेला कुंपण घालतात अशावेळी अन्य गावकऱ्यांचा रस्ता बंद होतो. अशाप्रकारच्या अनेक घटना घडून गावचे गावपण निघून जाऊन सामाजिक संतुलनही बिघडते.
दलालांच्या अमिषाला बळी न पडण्याचे आवाहन
अनेकवेळा दलालांच्या अमिषाला बळी पडून गावकरी जमीन कवडीमोलाने विकतात आणि फसतात. अशा घटना घडू नयेत म्हणून गावकरी एकवटले आहेत. बाहेरील व्यक्तीला गावातील अमीन खरेदी करण्यास सक्त मनाई करण्याचा ओळगावाने महत्वपूर्ण निर्णय घेतला. 152 कुटुंब असलेल्या छोट्याशा ओळगावाने घेतलेला निर्णय ओळ अधोरेखित करण्यासारखा निर्णय असून इतर गावांनी त्याचा आदर्श घेऊन आपल्या जमिनी विकू नयेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.