लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप, काँग्रेस, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि त्यांच्या मित्रपक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जागावाटपाचा तिढा सुटत आला असल्याचे दिसत आहे, मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.
दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील 18 लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आलेले मुंबईचे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे उपनेते दत्ता दळवी यांच्यावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर किशोर पोतदार, सुभाष म्हसकर यांच्यावर मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आमदार विलास पोतनीस यांच्यावर मुंबई उत्तर पश्चिम आणि माजी आमदार संजय कदम यांच्याकडे रायगड लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील 18 लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समन्वयक नेमले आहेत. यामध्ये मुंबईमधील सहा जागांपैकी चार जागांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गट मुंबईमध्ये चार जागा लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे राज्यातील मुंबईसह एकूण 18 जागांवर निवडणूक लढण्याचे ठाकरे गटाकडून निश्चित झाल्याच दिसत आहे.
लोकसभा समन्वयकांची नावे –
जालना : राजू पाटील
संभाजीनगर : प्रदीपकुमार खोपडे
जळगाव : सुनील छबुलाल पाटील
बुलढाणा : राहुल चव्हाण
रामटेक : प्रकाश वाघ,
यवतमाळ : वाशीम – उद्धव कदम
हिंगोली : संजय कच्छवे
परभणी : शिवाजी चोथे, संतोष सांबरे
नाशिक : सुरेश राणे
रायगड : संजय कदम
मावळ : केसरीनाथ पाटील
धाराशीव : स्वप्नील कुंजीर
कोल्हापूर : सुनील वामन पाटील
ठाणे : किशोर पोतदार, सुभाष म्हसकर
मुंबई उत्तर पश्चिम : विलास पोतनीस
मुंबई उत्तर पूर्व ( ईशान्य) : दत्ता दळवी
मुंबई दक्षिण मध्य : रवींद्र मिर्लेकर
मुंबई दक्षिण : सुधीर साळवी, सत्यवान उभे.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून विविध भागात जाऊन पक्षाची ताकद वाढवत आहेत. तर आता लोकसभा समन्वयक नियुक्त जाहीर करत ठाकरे गटाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.