(साखरपा / दीपक कांबळे)
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे कुरकुम मार्गे लांजा या मार्गावर रस्त्यालगत गटार गायब झाल्याचे चित्र आहे. रस्त्याला गटारे नसल्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये पावसाचे पाणी घुसत आहे. मात्र संबधित विभागाचे अधिकारी सुस्त बसलेले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकऱ्यांची पिके उगवण्याआधीच नष्ट होत असल्याची तक्रार दाभोळे गावातील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सोनू सुकम यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, येथील शेतकरी कोणतीही तक्रार करीत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. प्रतिवर्षी शेतकऱ्याला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. पावसाचा जोर वाढण्याआधी या मार्गावर गटारांची व्यवस्था न केल्यास तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन उभारावे लागेल असा इशारा रवींद्र सुकम याने दिला आहे.
पावसाळी हंगामात आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनात या मार्गावरील तुंबणाऱ्या मोऱ्या आणि जोरदारपणे शेतात वाहणारे पाणी याचा बांधकाम विभागाने विचार करू नये काय? असा खडा सवाल सुकम यांनी उपस्थिती केला आहे.