(संगमेश्वर / प्रतिनिधी)
भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध नसलेले खोटे नकाशे व उपधीक्षक यांना कोणतेही अधिकार नसताना खोट्या नकाशाच्या आधारे हायवेच्या नकाशात दुरुस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली दोन वर्ष तक्रार अर्ज असतानाही कोणतीही कारवाई संबधित विभाग करत नाही. तक्रारीची साधी दखलही घेण्याचे सौजन्य न दाखवणाऱ्या भूमीअभिलेख अधिकाऱ्यांविरुद्ध आता आमरण उपोषण करूनच न्याय मिळवणार अशी आक्रमक भूमिका पत्रकार श्री. मकरंद सुर्वे यांनी घेतली आहे.
या प्रकरणात संगमेश्वर तालुक्यातील अनेक प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकारावर अन्याय केल्याचे दिसून येत आहे. महामार्गात चुकीच्या पद्धतीने जमिनींचे व्यवहार करत जमीनी हडपण्याच्या अक्षम्य प्रकारास मूक संमती देऊन पत्रकार सुर्वे यांच्यावर अन्याय केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुर्वे यांच्यावर अन्याय करण्यासाठी उपअधिक्षकांनी मुस्ताक अहमद नूरखान खान यांच्याकडून लाच घेतली होती का? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे ही मागणी घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सुर्वे यांनी सांगितले आहे.
उपअधीक्षक भूमी अभिलेख देवरुख तात्कालीन उपाध्यक्ष भोसले यांनी संबंधित जमीन मालकाचा साधा अर्ज घेऊन नकाशामध्ये दुरुस्ती केली आहे. कोणतेही अधिकार उपअधीक्षकांना नसताना चुकीच्या पद्धतीने दुरुस्त करण्यात आले. पत्रकार सुर्वे यांच्या जमिनीचा नकाशा उपलब्ध नसताना त्यांना जीर्णमुकावरून खोटा नकाशा देण्यात आला. सुर्वे यांनी पैसे भरून सदर नकाशा व इतर सर्व नकाशे पाहणी केली असता जीर्णो कुठेही दिसून आलेले नाही. त्यामुळे सदर नकाशा रद्द करावा अशी मागणी केलेली असताना या विषयावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गेली दोन वर्ष हा विषय कारवाई शिवाय पडून आहे. हायवेचे सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी रत्नागिरी हे आहेत. परंतु त्यांच्याकडून कोणतीही परवानगी नसताना व अर्जदाराने कोणतेही अर्ज उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला नसताना यांनी परस्पर नकाशामध्ये दुरुस्ती केली. साधी नोटीसही जमिनीचा मालक म्हणून सुर्वे यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे भोसले व त्याला साथ देणारे सर्व अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पत्रकार मकरंद सुर्वे हे करत आहे. दरवेळी रत्नागिरीच्या अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडे पत्र देण्यात येतात, पत्र उपाधीक्षकांकडे जातात परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.
महसूल मंत्र्यांसह भूमी लेख वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पत्रव्यवहार
या प्रकरणात अमोल भोसले व कर्मचारी पिरजादे व इतर अधिकारी कार्यरत होते. त्यामुळे त्यावेळी कार्यरत असलेल्या सर्वांची सखोल चौकशी केल्यावर त्यांच्या चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. या प्रकरणा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही पत्रक देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मा. उपसंचालक, भूमीअभिलेख व मा. भूमीअभिलेख अधिक्षक, रत्नागिरी यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु याबाबत संबधित विभागाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने भुमिलेख अधिकारी हे सुर्वे यांचा अंत पाहत आहेत का? असे त्यांचे म्हणणे आहे.
उपअधीक्षक यांच्याकडून कारवाई का केली जात नाही?
या प्रकरणाबाबत गेली दीड ते दोन वर्ष देवरूख येथील भूमी अभिलेख कार्यालयाकडे अर्ज देण्यात आले आहेत. दरम्यान या अर्जावर उपअधीक्षक यांनी सुनावणी घेतली होती. त्यानंतर सर्व नकाशे काढण्यात आले होते. त्यासाठी सुर्वे यांनी पैसेही खर्च केले आहेत. नकाशे दिलेले असून देखील या प्रकरणावर योग्य कारवाई उपअधीक्षक यांच्याकडून का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या प्रकरणाबाबत पाठपुरावा करण्यासाठीं प्रत्येक वेळेस पत्रकार सुर्वे जात असतात. परंतु प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांकडून ‘…. करतो…करतो..’ असे सांगून वेळकाढूपणा करण्यात आला आहे. मात्र आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम अख्ख डिपार्टमेंट करतेय?
उपअधीक्षक यांना चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती केल्याचे समजताच त्यांनी तसा प्रस्ताव अधीक्षक यांच्याकडे पाठविणे आवश्यक असते. याबाबत महाराष्ट्र महसूल अधिनियम 257 नुसार अधीक्षक यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवण्याचे अधिकार आहेत. परंतु उपअधीक्षक यांना सर्व प्रकरणाची माहिती असून देखील अद्याप ही त्यांनी प्रस्ताव अधीक्षक यांच्याकडे पाठवलेला नाही असे सुर्वे यांचे म्हणणे आहे. वरिष्ठांकडे प्रस्ताव न पाठविल्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होत आहे. यावरून आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम अख्ख डिपार्टमेंट करत आहे की काय? असा देखील थेट सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
खोटे नकाशे देणाऱ्यांवर कारवाई करा
या विभागामध्ये जुन्या हायवेच्या नकाशामध्ये आमचा सर्वे नंबर आहे त्यावेळी त्याचे पैसे भेटले होते. आत्ताच्या हायवे चा नकाशा मध्ये जमीन माझ्या मालकीची असल्यामुळे मला त्या जमिनीचे पैसे मिळाले आहेत. कोणतीही तक्रार नकाशा चुकीचा असलेल्याची प्रांत अधिकारी किंवा लवादमध्ये करण्यात आलेली नाही. तरीही खोटा नकाशाच्या आधारे भोसले यांनी दुरुस्ती केली. तो नकाशा व मला देण्यात आलेला जीर्ण बुक वरील नकाशा हे दोन्ही नकाशे संबधित विभागाने कुठे तयार केले असा प्रश्न उपस्थित करत ते तात्काळ रद्द करावे अन्यथा खोटे नकाशे देणाऱ्यांवर कारवाई करावी अशी सुर्वे यांनी मागणी केली आहे.
जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम…
“संगमेश्वर तालुक्यामध्ये भूमी अभिलेखच्या कामावर लोक प्रचंड नाराज आहेत. या प्रकरणातून भूमी लेख विभागातील अधिकाऱ्यांचा गलथान कारभार अधिक स्पष्ट होत आहे. या प्रकरणात भूमीलेखचे अधिकारी लटकण्याची शक्यता आहे. सर्व कागदपत्रांची छाननी करून आणि यामधील प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करून सत्य बाहेर काढावे, मात्र तरीही माझ्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करून सत्याग्रह करण्यावर मी ठाम आहे,” अशी आक्रमक भूमिका पत्रकार सुर्वे यांनी घेतली आहे. अशाच प्रकारे देवरूख भूमी अभिलेख कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असेल तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी कारवाई करतील का? असा आता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.