(संगमेश्वर / एजाज पटेल)
मृत्यू हा सर्वांसाठी समान आहे. राजा असो व रंक, त्याला निसर्गाचे दान आहे. मृत्यूने परिवर्तने घडतात. शत्रू सारे मित्र बनतात. कालचे शिव्याशाप देणारे आज डोळे भरून रडतात. तोंड फिरवणारे सारे रांगेत येऊन दर्शन घेतात. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यांसाठी पुढे धावतात. जीव घेण्यास आसुसलेले पुढे होऊन फुले वाहतात. मृत्यू समोर माना वाकतात, मान देण्यास संगिनी वाकतात. मृत्यू हा अटळ असतो म्हणून तो सत्य असतो. जीवनात काही मिळो वा ना मिळो मृत्यू सर्वांना मिळतो.जीवनात मानवाला आनंद, दुःख व यातना सहन करावा लागतात. स्मशान म्हणजे मानवी जीवनाचा शेवटचं प्रवास जेथे मृतदेह दहन करतात ती जागा. स्मशानभूमीची शेड आहे पण ती नादुरुस्त असल्याने अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतोय.
संगमेश्वर येथील नादुरुस्त झालेल्या स्मशान शेडच्या दुरुस्तीचा खर्च उचलला संगमेश्वर येथील स्थानिक तरुणवर्गाने. नुसता खर्चाचा भारच उचलला नाही तर नादुरुस्त स्मशान शेड उभारण्यासाठी अंगमेहनत सुद्धा केली. सामाजिक बांधिलकीतून चांगला संदेश देणारे काम त्यांनी केले आहे.
संगमेश्वर -देवरुख मार्गांवर असलेल्या मारुती मंदिर समोरील स्मशान शेड पूर्णतः नादुरुस्त झाली होती. या शेडवरील पत्रेही जीर्ण झाले होते. यामुळे मोठी अडचण निर्माण व्हायची ही अडचण लक्षात घेत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहून समाजासाठी धडपडणारे येथील ग्रामपंचायत सदस्य संजय कदम, प्रसाद सुर्वे, दादू भिंगार्डे, गौरव सुर्वे, संतोष आंब्रे, महेश भानुशाली, संतोष खातू, तुषार सुर्वे, बाबू चिचकर या तरुणांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वखर्च करत तसेच अंगमेहनत करून नादुरुस्त स्मशान शेड दुरुस्ती करण्यास मदत केल्याने उद्भवणाऱ्या गैरसोईला आणि अडचणीला पूर्णविराम मिळाला आहे.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेले हे काम समाजाला चांगला संदेश देणारा असून या स्थानिक तरुणांनी गैरसोय दूर केल्यामुळे समाधान व्यक्त होत असून अनेकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.