(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यांतील रांगव कुंभारवाडीतील दिपक कुंभार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुसऱ्या दिवशी जुळ्या दोन्ही मुलींचा इतिहासाचा पेपर होता. एकीकडे दुःखाचा डोंगर होता तर दुसरीकडे शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पाही होता. घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दोघींनी दुसऱ्या दिवशी परीक्षाही दिली. या घटनेचे वृत्त दैनिक, डिजिटल माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाले. भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार यांनी रत्नागिरी जिल्हा व तालुका शाखेच्या वतीने कुंभार कुटुंबियांना भेट देऊन आर्थिक मदत सुपूर्द केली आहे.
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरक्या झालेल्या तन्वी व जान्हवी या जुळ्या बहिणींच्या पाठीशी आर्थिक मदतीची भिंत उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. या जुळ्या बहिणींचे वडील दिपक कुंभार यांचे वयाच्या ४२ व्या वर्षीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना रात्रीच्या २२ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. अचानक समोर आलेल्या या संकटाने दोघीही हादरल्या तरी काळजावर दगड ठेवत घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दोघींनी दुसऱ्या दिवशी परीक्षाही दिली. त्यानंतर मृत वडिलांचा पुढील विधी ग्रामस्थांसह करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे.
३० मार्च शनिवारी रोजी रत्नागिरी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार व तालुकाध्यक्ष विशाल सावंत यांच्यासह सहकारी दिलीप पाटील, नंदकुमार सावंत, सिद्धार्थ जाधव यांनी कुंभार कुटुंबियांना भेट देऊन सांत्वन केले. या मुलींच्या शिक्षणाविषयी असलेल्या जिद्दीचे कौतुक केले. भीम आर्मी रत्नागिरी जिल्हा, तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करत स्वेच्छेने काही रक्कम एकत्रित करून कुंभार कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. तसेच मुलींच्या पुढील शिक्षणासाठी जे सहकार्य लागेल, ते आम्ही आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देखील दिले.
दिपक कुंभार यांचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सावरण्यासाठी व चार मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. आम्ही आमच्या वतीने तातडीची आर्थिक मदत केली आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामधील दानशूर व्यक्तीनी, सामाजिक संघटनांनी पुढे येऊन कुंभार कुटुंबियांना आर्थिक हातभार व सहकार्य करावे असे आवाहन भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा पवार यांनी केले आहे.