(मुंबई)
माजी आमदार राजन तेली यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले. यावेळी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना सावंतवाडी मतदार संघातून संधी मिळण्याची शक्यता आहे. आज मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष संदेश निकम आदी उपस्थित होते.
माजी आमदार राजन तेली यांनी भाजपा प्राथमिक सदस्यत्व व सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा पत्रात “एकाच कुटूंबाला एक लोकसभा, दोन विधानसभा आणि त्यांच्या कलानेच चालणाऱ्याला तिसऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. ही घराणेशाही मला मान्य नाही”, असे म्हटले आहे.
राजन तेली यांच्या ठाकरे शिवसेनेत प्रवेशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत. राजन तेली यांनी भाजप सोडली आहे. उद्धव ठाकरे यांची साथ घेतली आहे. राजन तेली यांची स्वतःची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ताकद आहे. मात्र तेलींना स्थानिक ठाकरे शिवसेना कशा पद्धतीने स्वीकारते हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आगामी काळात कोकणातील राजकारण पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असेच पाहायला मिळणार आहे.
सावंतवाडीतून उमेदवारी मिळेल नाही मिळेल मला माहिती नाही. जो आदेश येईल त्यानुसार मी काम करेन. पण सावंतवाडीमधून जर मला उमेदवारी मिळाली तर दीपक केसरकर यांचा पराभव निश्चित आहे आणि तशी तयारी मी केली आहे, असे राजन तेली यांनी म्हटले आहे.