(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नसल्याने शिक्षक पदविका घेतलेल्या तरुण, तरुणी भरतीची आतुरतेने वाट पहात होते. शिक्षकाअभावी रिक्त असणाऱ्या शाळांतील विद्यार्थी आणि पालकही वाट पहात होते. अखेर भर्ती प्रक्रिया अत्यंत जवळ येऊन ठेपली असताना दुधात मिठाचा खडा टाकलाच. उर्दू माध्यमाच्या शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात ५८ उर्दू शिक्षकांची गरज असताना तब्बल २२ मराठी शिक्षकांची इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. भाषा शिकविण्यासाठी त्या शिक्षकाचे माध्यमिक शिक्षणा पर्यंत शिक्षण होणे गरजेचे आहे. आता इंग्रजी शिकवताना विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचे ज्ञानच त्या शिक्षकाला नसेल तर तो विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेत अनुवाद करून शिकवेल. विद्यार्थ्याला कितपत समजेल याची शाश्वती नाही. उर्दू शाळेत शिकविण्याची त्या शिक्षकाची मानसिकता असेल की नाही? त्या शिक्षकामध्ये आत्मविश्वास असेल की नाही, या विवेचनात विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत.
शिक्षक भरती शासनाला नक्की करायची आहे की नाही? की वेळकाढूपणा करायचा आहे. या बाबत सामाजिक कार्यकर्त्या रिझवाना एजाज इब्जी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, रत्नागिरी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन उर्दू शाळेत उर्दू भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत विनंती केली आहे. या बाबत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांनाही ट्विट करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.