(गणपतीपुळे / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड आणि कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुंड यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिन कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे कविवर्य केशवसुत स्मारकात अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला.
या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि कवी केशवसुत यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्वच मान्यवर पाहुणे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी करून वाचन प्रेरणा दिनाची पार्श्वभूमीची माहिती सांगताना राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची कल्पना मांडली. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजकांच्या वतीने वाचन स्पर्धा – २०२४ घेण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीचा उतारा वाचावयास सांगावण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे परीक्षण करून त्यातील उत्कृष्ट वाचकांचे क्रमांक काढण्यात आले. या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा बँकेच्या ग्राहक समितीचे सदस्य विलास राणे आणि बळीराम परकर विद्यालय मालगुंडचे यादव सर यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुर्वे सर यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि वाचन याबद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर यांनीही आपले अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या आयुष्यामध्ये वाचनाचे खूप महत्त्व आहे असे मार्गदर्शन करतानाच सर्वांनी प्रत्येक दिवशी वाचन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड आणि कवी केशवसुत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वाचन स्पर्धेचा बक्षीस वितरणही यावेळी संपन्न झाला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, पुष्प देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील तथा बंधु मयेकर, बळीराम परकर विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांचे सहकार्य लाभले आणि माधव अंकलगे, विलास राणे, ग्रंथपाल स्वप्नेश राजवाडकर, लिपिक कुमार डांगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये विशेष प्रयत्न केले. तर कार्यक्रमाच्या प्रसंगी सदस्या दिपाली केळकर, संजय शितप, रजत पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सांगता कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्तीच्या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अरुण मोर्ये यांच्या मराठी अभिजात झाली या कवितेने करण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषदेत शाखा मार्गदर्शनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.