(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गाचे काम टप्पा-टप्प्यात सुरू आहे. या कामाने सध्या हातखंबापासून वेग धारण केल्याचे चित्र आहे. हातखंबा तिठा येथे पोकलेनच्या साहाय्याने खोदाई करण्याचे काम सुरू आहे. मात्र या खोदाई कामात आता अनधिकृत आंब्याचा स्टॉल अडसर ठरत आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाने अनधिकृत बांधकामांना, टपरी, खोकेधारकांना यापूर्वीच नोटीस दिल्याची माहिती आहे.
हातखंबा तिठा येथील दोन्ही पेट्रोल पंपासमोर वाहनांची मोठी गर्दी होते. काही वेळेस या भागात वाहतूकोंडीची समस्या निर्माण होते. याच भागात अनधिकृतपणे रस्त्याच्या लगतच स्टॉल उभारून आंबा विक्री केली जाते. या आंबा विक्रेत्यांनी आपले बस्तान रस्त्याच्या कडेला बसविल्याने वाहनधारकांना वाहतूकोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने हातखंबापासून पुन्हा एकदा वेग धरला आहे. हातखंबापासून निवळीपर्यंत काँक्रिटीकरणाची तुकड्यात एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. तर आता हातखंबा तिठा या महत्वाच्या स्पॉटवर काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूने खोदाई केली जात आहे. मात्र सुरू असलेल्या कामात अनधिकृत आंब्याच्या स्टॉल उभारल्याने सुरू असलेल्या कामात अडसर निर्माण होत आहे. पोकलेनच्या साहाय्याने सुरू असलेले काम तिथेच बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने यापूर्वीच अनधिकृत बांधकाम, खोकेधारक आदी सर्वांनाच नोटीसद्वारे सूचना दिलेल्या आहेत. या सूचनांचे पालन करत पेट्रोल पंपातील साधने हलविण्याचे काम सुरू आहे. व महामार्ग प्राधिकरण विभागाला जागा मोकळी करून दिली जात आहे. मात्र काही महाभाग जाणीवपूर्वक स्टॉल उभारून चौपदरीकरणाच्या कामात अडसर निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे महाभाग नोटीसीला जुमानत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या अनधिकृत खोकेधारक व आंबे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारून यांना नियम शिकवण्याची जबाबदारी आता प्राधिकरण विभागावर येऊन ठेपली आहे.