( रत्नागिरी )
आर्थिक अडचणीसह कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या किसान सन्मान निधी योजनचा लाभ जिल्ह्यातील काही आयकर भरणारे तसेच शासकीय कर्मचारी घेत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ५ हजार ४१५ अशा सधन शेतकऱ्यांना पैसे परत करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार १६४ जणांनी १ कोटी ४६ लाख ६० हजार रुपये परत केले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांकडील रकमेची अद्याप वसुली सुरू आहे.
पंतप्रधान किसान योजनेंतर्गत चार महिन्यांनी दोन हजार रुपये म्हणजेच वर्षभरात शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन देण्याची योजना केंद्र शासनाने २०१९ साली सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ६९,०८३ लाभार्थी आहेत. मात्र, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी आयकरदाते आणि शासकीय कर्मचारी घेत असल्याचे निदर्शनात आल्याने अशांकडून घेतलेल्या निधीची रक्कम भरून घेण्याची कारवाई सुरू आहे.
यापैकी आयकर भरत असलेल्या ४८८४ लाभार्थ्यांकडून आतापर्यंत २६,००३ हप्ते भरण्यात आले आहेत. उर्वरित अपात्र शेतकऱ्यांकडील वसुलीबाबत पाठपुरावा सुरू आहे. मात्र, काही अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्याकडील रक्कम कशी वसूल करावी, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. वसुलीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत नियोजन सुरु आहे.