(भोपाळ)
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपल्या 100 उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. 10 ऑक्टोबर रोजी प्रियंका गांधी यांच्या सभेच्या समाप्तीनंतर या नावांची घोषणा केली जाणार आहे. ज्यांची नावे निश्चित करण्यात आली आहे त्या उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचनाही पक्षाकडून करण्यात आली आहे.
निवडणूक उमेदवारांच्या निवडीच्या संदर्भात झालेल्या पहिल्याच बैठकीत या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणूक समितीचे सदस्य आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ या बैठकीला उपस्थित होते. या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांची नावे असून काही बड्या नेत्यांची नावेही अंतिम करण्यात आली आहेत. अजय सिंह, मुकेश नायक, सुरेश पचौरी, रामनिवास रावत या 2018 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची नावेही अंतिम करण्यात आली असल्याचे समजते.
विजयी होण्याची क्षमता हा निकष आहेच त्याचबरोबर उमेदवाराचे नाव आणि त्याच्या जातीच्या लगतच्या मतदारसंघावर विपरित परिणाम होणार नाही, याचीही विशेष दक्षता घेण्यात आली आहे. कॉंग्रेस पक्षाची सध्या जनआक्रोश यात्रा सुरू आहे. या यात्रेला झालेल्या गर्दीचे निकषही उमेदवारी देताना लावण्यात आले आहेत. ज्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांना अगोदरच तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कॉंग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत म्हणाले की भाजपने तीन याद्या जाहीर करून 79 उमेदवारांची घोषणा केल्यावर आमची धडधड वाढली होती. मात्र ही बाबही पक्षासाठी फायद्याची ठरणार आहे.
दरम्यान, तिकिटवाटपाच्या कॉंग्रेसच्या या बैठकीत बरीच भांडणे झाली असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीनने केला आहे. कॉंग्रेस पलायन करणारा पक्ष झाला असून अनेक बडे नेते निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढत असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी केला आहे. तर दिग्विजय सिंह निवडणूक लढणार नाही. अरूण यादव यांनीही निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. कमलनाथ यांचीही रिंगणात उतरण्याची इच्छा नाही कारण काय होणार आहे याची सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे निवडणुकीपासून पळ काढण्याचा प्रयत्न कॉंग्रेसच्या नेत्यांकडून केला जातो आहे.