( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत पंचायत समिती संगमेश्वरच्या सांगवे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधामापूर सप्रेवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठधामापूर या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षण परिषदेत महावाचन चळवळ वाचन संस्कृतीच्या विकासासाठी एक सशक्त अभियान या विषयावर माधव विश्वनाथ अंकलगे यांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेली महावाचन चळवळ ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण वाचनातूनच विद्यार्थी घडू शकतात. मोबाईल, टीव्ही गेम्स इत्यादी घातक परिणाम करू शकणाऱ्या गोष्टीपासून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यासाठी वाचन अत्यंत महत्वाचे व उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वाचनासाठी विद्यार्थ्यांना प्रयुक्त करणे अत्यावश्यक असल्याचे यावेळी सांगितले. तसेच वाचनासाठी कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबविता येऊ शकतील याबाबत माहिती सांगितली.
यावेळी सांगवे केंद्राच्या केंद्रियप्रमुख उज्जवला धामणस्कर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधामापूर सप्रेवाडी शाळेचे मुख्याध्यापक अरुण जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठधामापूर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधामापूर सप्रेवाडी शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश सप्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठधामापूर शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. गौरी गुरव यांच्यासह सांगवे केंद्रातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षक उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेच्या वेळी सांगवे केंद्राच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२४ प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी करंबेळे शिवरवाडी शाळेतील सहशिक्षिका वेदिका पराडकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि शिक्षकांना जे डी पराडकर लिखित चपराक प्रकाशनचे ” हळवा कोपरा ” हे पुस्तक ३० जणांना भेट म्हणून देऊन वाचन चळवळ सशक्त करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवर तसेच करंबेळे शिवरवाडीच्या मुख्याध्यापिका टाकळे मॅडम यांनी वेदिका पराडकर यांना धन्यवाद दिले.