(देवरुख)
आंबव येथील प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल शाखेने विद्यार्थ्यांसाठी आठ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. तृतीय व अंतिम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना यामध्ये “कटीया व्ही 5 सॉफ्टवेअर” विषयी एम कॅड सोलुशन्स पुणे या संस्थेचे सी इ ओ मनोज पोतदार यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. अच्युत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यशाळा समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी प्रथम प्रास्ताविक केले. यानंतर डॉ. अच्युत राऊत यांनी तज्ञ प्रशिक्षकांचे स्वागत करून कार्यशाळेचे प्रयोजन स्पष्ट केले. तसेच त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली.
यानंतर ट्रेनर मनोज पोतदार यांनी पुढील आठ दिवस कटीया व्ही 5” सॉफ्टवेअरवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. सुरुवातीला त्यांनी या सॉफ्टवेअरची प्राथमिक माहिती दिली. या सॉफ्टवेअरचा मुख्यतः नवीन प्रोडक्टच्या डिझाईनसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामध्ये कॅड, कॅम तसेच सी ए इ इत्यादि सर्व बाबींचा समावेश आहे. हे सॉफ्टवेअर ऑटोमोबाईल, एरोस्पेस, डिफेन्स, प्लांट डिझाईन, अग्रीकल्चर, बांधकाम, पेट्रोलीअम यासारख्या क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर वापरले जाते.
या कार्यशाळेदरम्यान मनोज पोतदार यांनी या सॉफ्टवेअरचा वापर करताना आवश्यक असणाऱ्या प्राथमिक बाबी स्पष्ट करताना त्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध कमांड तसेच पार्ट मोडेलिंग, असेम्ब्ली, ड्राफ्टिंग, शेप डिझाईन, जनरेटीव डिझाईन करण्याची पद्धत सखोलपणे विषद केली. कार्यशाळेच्या अंतिम सत्रामध्ये या सॉफ्टवेअरवर आधारित उद्योगांमध्ये सध्या उपलब्ध असणाऱ्या रोजगार संधीची त्यांनी माहिती दिली. महाविद्यालयाच्या मेकॅनिकल व ऑटोमोबाईल शाखेतील बहुतांश विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले.
कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. महेश भागवत, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. अच्युत राऊत, ऑटोमोबाईल विभागप्रमुख व महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. अनिरुध्द जोशी, मनोज पोतदार यांची उपस्थिती होती. डॉ. अनिरुध्द जोशी यांनी यावेळी आपल्या भाषणात अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्याना कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असून त्यामुळे त्यांची रोजगारक्षमता वाढण्यास मदत होईल असे सांगितले. प्राचार्य डॉ. महेश भागवत मार्गदर्शन करताना म्हणाले कि, सध्या प्राथमिक ज्ञानाव्यतिरिक्त इतर कौशल्ये फार महत्वाची असून हि कार्यशाळा त्यासाठी पूरक आहे. विद्यार्थ्यांनी असे उपक्रम जाणीवेने पूर्ण करण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठीहि प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातूनच अधिकाधिक रोजगार संधी प्राप्त करणे शक्य आहे. तसेच विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनविण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व विभागामध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेतले जात आहेत असेही ते म्हणाले.
यानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक प्रा. मंगेश प्रभावळकर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागीय प्राध्यापक व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.