(रत्नागिरी)
भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचा थरार गुरूवारपासून सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिल्याच सामन्यात महाराष्ट्र संघाने आसामवर सहज मात करत विजयी सलामी दिली. यामध्ये महाराष्ट्र संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार पहिल्याच सामन्यात चमकली.
या स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत चालणार आहेत. महाराष्ट्राच्या महिला संघाने आसामचा एक डाव २६ गुणांनी (३६-१०) पराभव करत विजयी सलामी दिली. महाराष्ट्र संघाकडून अश्विनी शिंदे (३.२० मि. संरक्षण व ८ गुण), अपेक्षा सुतार (२.५० मि. संरक्षण व २ गुण), रेश्मा राठोड (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (नाबाद २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. आसामकडून प्रिया (१.४०, १.२० मि. संरक्षण), निहारिका (२ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापूढे आसामचा संघ टिकाव धरू शकला नाही.
पुरूषांमध्ये अ गटात रेल्वे, पॉडेचेरी, पंजाब, इंडो-तिबेटीअन बॉर्डर पोलीस, एसएसबी. ब गटात महाराष्ट्रासह तामिळनाडू, त्रिपूरा, मणिपूर, आसाम. क गटात कोल्हापूर, दिल्ली, हरयाणा, दादरा नगर हवेली, सिक्कीम. ड गटात कर्नाटक, मध्यभारत, झारखंड, उत्तराखंड, महा पोलीस. इ गटात ओडीसा, विदर्भ, हिमाचलप्रदेश, लडाख. फ गटात आंध्रप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, जम्मु काश्मिर. जी गटात वेस्टबंगाल, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार. एच गटात केरळ, तेलंगणा, गोवा, चंदिगड यांचा समावेश आहे.
महिलांमध्ये अ गटात समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, इंडो-तिबेटीअन बॉर्डर पोलीस आणि आसाम यांचा समावेश आहे. ब गटात एअरपोर्ट, राजस्थान, तेलंगणा, एसएसबी, सिक्कीम. क गटात दिल्ली, आंध्रप्रदेश, झारखंड, दादरा नगर हवेली, त्रिपूरा. ड गटात ओडिसा, पंजाब, पाँडेचेरी, जम्मू-काश्मिर, महा पोलीस. इ गटात गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गोवा, लडाख. फ गटात केरळ, विदर्भ, हिमाचल प्रदेश, मणिपूर. ग गटात कर्नाटक, कोल्हापूर, उत्तराखंड, बिहार. एच गटात हरयाणा, राष्ट्रीय अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या महाराष्ट्रचे दोन्ही संघ अंतिम फेरीत प्रवेश करत अव्वल कामगिरीसाठी सज्ज आहेत, असा विश्वास भारतीय महासंघाचे डॉ. जाधव यांनी व्यक्त केला.