(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नागपूर महामार्गावर भल्या मोठ्या मोऱ्या उभारण्यात आले आहे. या भागात काही मोऱ्यांचे काम सुरू आहे तर काही ठिकाणी पूर्ण झाले आहे. पानवळ येथील एका मोरीचे भगदाडात पहिल्याच पावसात सर्व माती मोरीत जाऊन चिखल साचून राहिला आहे. यामुळे मोरीच्या बाहेरच पाणी साचून राहू शकते. या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास येत नसून काम करणारा ठेकेदार ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
खरंतर महामार्गावरील मोऱ्या म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा अशी स्थिती आहे. या मोऱ्या पाणी जाण्यासाठी केल्या खऱ्या मात्र चौपदरीकरणाचा रस्ता हा उंच झाल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. या मोऱ्या बंदिस्त असणे आवश्यक आहेत. भल्या मोठ्या मोर्यांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोऱ्यांमधील दारुड्यांचे अड्डे व झोपण्याची सोयीस्कर जागा महामार्ग प्राधिकरण विभागाने करून दिली आहे. तसेच उघडी ठेवण्यात आलेली मोरीची भगदाडे ही अपघातांना कारणीभूत ठरणारी आहेत. मात्र प्रशासनाने महामार्गासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भल्या मोठ्या मोऱ्यामधून पाण्याचा निचरा झालं नाही तर अमाप खर्च केलेला पैसा वाया जाईल, मोऱ्या उभारून तशाच ठेवण्यास आल्या आहेत. मोरीच्या मुखाजवळ खोलगट भाग ठेवण्यात आला आहे. यातून भविष्यात अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. वेळीच उपाययोजना कराव्या अशी मागणी जनतेमधून होत आहे.
हातखंबा तिठा येथील प्रकल्पग्रस्त कपिलानंद कांबळे यांच्या घरासमोरील मोरीसंदर्भात अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वी त्यांनी मोरीमध्ये सिमेंट पाईप टाकून मोरी बंदीस्त करून त्यावरून रस्ता देण्याची मागणी कांबळे केली आहे. मात्र प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतलेली दिसून येत नाही. मोरी बंदीस्त करून त्यावरून रस्ता दिला नाही तर उपोषण छेडण्याची भूमिका घेण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले आहे.