( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील पाली परिसरामध्ये अवैध दारू, मटक्याचे धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांवर पोलिस कारवाई करत नसल्याने अवैध धंदेवाले मोकाट झाले असल्याचे चित्र सद्यःस्थितीत दिसून येत आहे. जिल्हा पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे, तर स्थानिक पोलिस प्रशासन वेळप्रसंगी कारवाईचा बडगा उगारत कारवाईचा फार्स करत आहे.
पाली पोलीस चौकीतील हद्दमध्ये बोकाळलेल्या अवैध्य धंद्याबाबत जिल्हा पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे, तर स्थानिक पोलिस प्रशासनाकडून वेळप्रसंगी चिरीमिरी कारवाई करण्यात येते.प्रत्यक्षात अवैध धंदे ज्या भागात सुरू आहेत त्या भागातील धंदे पोलिसांना माहिती दिलेली असते.स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने धंदे चालू असल्याची चर्चा वारंवार कानी येते. अवैध धंद्यांना जरब बसेल आणि सर्वसामान्यांना विश्वास वाटेल, अशा मोठय़ा कारवाया जिल्ह्यात कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे पाली सारख्या मोक्याच्या ठिकाणी अवैध दारू, मटक्याचे धंदे राजरोस सुरू असल्याचे पाहायला मिळते.
तरुणाई दिवसेंदिवस व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे. व्यसनाच्या विळख्यातून तरुणांची सुटका करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेऊन अवैद्य धंद्याचे बीमोड होईल, अशा कारवाया कराव्या, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.