(रत्नागिरी)
रत्नागिरी पासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या करबुडे येथील गावात माणुसकीला जागवणारी एक घटना घडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी हे गाव असल्याने पंचक्रोशीत या ठिकाणाला महत्त्व आहे. अशा ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करून अनेक गोरगरीब आपली पोटाची खळगी भरत आहेत. येथे सर्व व्यावसायिक स्थानिकांना चांगली सेवा देऊन एक दुसऱ्याला सहकार्य करत सर्वांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत करीत असतात.
करबुडे फाट्यावर एक वेडा अनेक दिवस एक भाजी विक्रेत्या महिला असलेल्या मिनाक्षी राजेंद्र सिध्दगवळी यांच्या भाजी दुकानाबाहेर नित्यनेमाने बसू लागला. तो गरीब वेडा भुकेसाठी कोणाकडेही अन्न सुद्धा मागत नसे किंवा पैसेही मागत नसे. मिनाक्षी राजेंद्र सिध्दगवळी या महिलेने त्याची अवस्था बघून त्या भुकेलेल्या व्यक्तीला अनेक दिवस सकाळ नास्ता, दुपार रात्री जेवण देऊन त्याची विचारपूस केली. त्याचेबाबत इतर दुकानदारांनाही माहिती दिली. ही व्यक्ती थोडी वेडी आहे. मात्र मी अनेक दिवसांपासून त्या विचारत असल्याने ही व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असल्याचे त्याचेकडून समजले. आपण काहीतरी केले पाहिजे आणि या व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांकडे पोहोचविले पाहिजे हि भावना मिनाक्षी यांच्या मनाला सतावत होती. त्यांनी यासाठी प्रयत्नसुरु केले. अन्यथा या उन्हाळ्यात त्याची तब्येत कशी राहिल? आणि उन्हाळा गेला तरी पावसाळ्यात त्याची काय अवस्था होईल? या विवेचनेत मिनाक्षीताई होत्या. यावेळी त्यांनी जातधर्म पाहिला नाही, पहिली ती फक्त त्यांनी माणुसकी.
आजूबाजूच्या व्यावसायिकांच्या सहकार्याने मिनाक्षीताईंनी त्या व्यक्तीला त्याचे घरी पोहचविण्याचा चंग बांधला. दरम्यान, येथील दुसरे व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते मकबूल मुकादम यांनी हिंगोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यानंतर मोठ्या परिश्रमाने त्या व्यक्तीच्या गावातील पोलीस ठाण्याशी संपर्क झाला. सदर वेडी व्यक्ती ही मुस्लिम निघाली. जावेद शेख असे त्या व्यक्तीचे नांव समजले. जावेद वेडाच्याभरात रत्नागिरीत आल्याचे यावेळी समजले. पोलिसांनी त्याचे नातेवाईकांशी संपर्क केल्यावर हिंगोली जिल्ह्यातील त्या व्यक्तीचे नातेवाईक येऊन जावेदला घेऊन गेले.
मिनाक्षीताईंनी जातपात न बघता निव्वळ माणुसकी जपल्याने एका व्यक्तीला तिचे घर परत मिळाले आहे. प्रत्येकाने याबाबत विचार व आचार केल्यास समाजातील अनेक गरजवंताना आपण हातभार लावू शकतो. मिनाक्षीताईच्या या कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.