(रत्नागिरी)
रत्नागिरी येथे सकल हिंदू जनसमुदायाने मोठ्या संख्येने एकत्र येऊन नववर्ष स्वागतयात्रा काढली. काटेकोर नियोजन, शिस्तबद्ध आणि सामाजिक स्थितीचे भान राखत काढलेली नेत्रदीपक अशा या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, मंगलमय वातावरणात संपन्न झाली. पारंपरिक वेशभूषा, भगवे ध्वज, नाक्यानाक्यांवर काढलेली आकर्षक रांगोळी, रस्ता दुभाजकांवर उभारलेल्या गुढ्या अशा आनंददायी वातावरण शहरात हिंदू नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात आली. या स्वागतयात्रेचे नियोजन ग्रामदैवत श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर देवस्थान संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था व सर्व हिंदुत्ववादी संस्था, कार्यकर्त्यांनी केले. हिंदू एकतेचे दर्शन घडवत स्वागतयात्रा काढण्यात आली.
झाडगाव येथील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेला प्रारंभ झाला. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते. शहराच्या विविध मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भगवेमय झाले होते. सकाळी ९ वाजता मारुती मंदिर येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वागतयात्रा सुरू झाली.यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेत १०० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. सामाजिक संदेश, छत्रपती शिवाजी महाराज देखावा, स्वामी समर्थ, राधा- कृष्ण असे विविध देखावे केले होते.
शहराच्या विविध मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भगवेमय झाले होते. स्वागतयात्रेच्या मार्गावर सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्याने वातावरण भगवेमय झाले. रत्नागिरीच्या इतिहासातील हिंदू एकतेचे दर्शन घडवणारी एक भव्य यात्रा म्हणून या स्वागत यात्रेची नोंद झाली. यंदा अनेक संस्थांनी प्रथमच स्वागतयात्रेत भाग घेतला. स्वागतयात्रेमध्ये प्रभू श्रीराम, कृष्ण यांचे देखावे सादर केले. तसेच भजन पथक, ढोल-ताशे पथकांनी जल्लोष केला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा लक्षवेधी ठरला. तसेच धारकऱ्यांनी घुंगूरकाठीचे सादरीकरण केले. गडकिल्ले शौर्य मोहिमेची माहितीसुद्धा दिली.
ग्रामदैवत भैरी देवस्थानचे उपाध्यक्ष राजन जोशी, सर्व विश्वस्त, विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, अॅड. बाबा परुळेकर, राजेश आयरे, सचिन वहाळकर, अनिल पोटफोडे, राजू जोशी, प्रवीण जोशी, श्री. अकिवटे, अॅड. रुची महाजनी, तनया शिवलकर, गजानन करमरकर, राहुल पंडित, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भोवड, मंगेश मोभारकर, कौस्तुभ सावंत, संतोष पावरी, राकेश नलावडे, सुहास ठाकुरदेसाई, महेश नवेले, संतोष पावरी यांच्यासमवेत हिंदू बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.