(चिपळूण)
तालुक्यातील कादवड येथील दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या धक्क्यातून आजही जाधव व निकम कुटुंबांसह कादवड कातकरवाडी सावरलेली नाही. या मुलींचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वाडीमध्येही भयाण शांतता पसरली आहे. दरम्यान, अलोरे शिरगाव पोलिसांमार्फत या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला गती दिली असून, ग्रामस्थांसह त्यांनाही व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालानंतरच या मृत्यूचे कारण उलगडणार आहे.
कादवड नदीकिनारी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मधुरा लवेश जाधव (१४) व सोनाली राजेंद्र निकम (१४) या दोन शाळकरी मुलींपैकी एकीचा मृतदेह आढळून आला तर दुसरीचा उपचारासाठी नेत असतानाच मृत्यू झाल्याची घटना दि. १६ मार्च रोजी घडली होती. या घटनेने कादवड पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली. त्यांचा मृत्यू नदीत बुडून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
या दोन्ही मुली आकले येथील मोहन विद्यालयात इयत्ता ९वीमध्ये शिकत होत्या. त्यांच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे कादवड गावासह कातकरवाडीवर मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे वाडी सुनीसुनी झाली आहे. तर या दोघींचे कुटुंबही या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाही. व्हिसेरा रिपोर्ट मिळताच त्या मृत्यूमागचे खरे कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.