(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे मंगळवार दिनांक २५ जून रोजी अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव असल्याने घाट माथ्यावरील भाविकांची मोठी गर्दी होऊ शकते. त्या अनुषंगाने संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, ग्रामपंचायत गणपतीपुळे व जयगड पोलीस ठाणे यांचेवतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवा निमित्ताने मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित मिळावे यासाठी दर्शन लाईनची अतिशय चोख व्यवस्था संस्थान श्रीदेव गणपतीपुळे च्या वतीने करण्यात आली आहे. या दर्शनरांगा उभारताना भाविकांचे पावसापासून संरक्षण व्हावे याकरिता खास दर्शन रांगांवर ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आदींसह घाटमाथ्यावरील अन्य ठिकाणांहूनही मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. या अनुषंगाने विशेष खबरदारी घेतली जात आहे. या ठिकाणी गणपतीपुळे परिसरातील विद्युत व्यवस्था सुरळीत असावी या उद्देशाने गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून खबरदारी घेण्यात आली आहे. यांमध्ये येथील मोरया चौकामध्ये पूर्णपणे लाईट व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांच्या वाहनांची मोठी गर्दी लक्षात घेऊन येथील सागर दर्शन पार्किंग मध्ये पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आली असून गणपतीपुळे पोलीस प्रशासन यावर नजर ठेवून आहे.
एकूणच भाविकांच्या संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जयगड पोलीस ठाण्याकडून जादा पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली असून पोलीस यंत्रणेच्या वतीने संपूर्ण गणपतीपुळे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. संपूर्ण गणपतीपुळे परिसरात अंगारकी चतुर्थी यात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत असून विविध ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.