( महाड )
शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप करून इच्छामरणाची परवानगी मागणारे पत्र राष्ट्रपतींना पाठवल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्र लिहिणारे कल्पेश पांगारे हे महाड तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच असून त्यांनी कुटुंबासह आमदार गोगावले यांच्या घरासमोर जूनमध्ये आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
आमदार गोगावले यांचा पिंपळवाडी ग्रामपंचायत कामामधील हस्तक्षेप आणि त्यांच्यापासून जीवितास असणारा धोका याबाबत स्थानिक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला वारंवार कळवून देखील तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर पिंपळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची मागणी पत्राद्वारे केली आहे. याबाबत देखील निर्णय झाला नाही तर आपण आपल्या कुटुंबासह गोगावले यांच्या खरवली ढालकाटी येथील घरासमोर जून 2024 महिन्यात आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.
महाड तालुक्यातील पिंपळवाडी या गावचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी ग्रामपंचायतीमधील सुरू असलेल्या मनमानी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवल्यानंतर आमदार गोगावले आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कल्पेश पांगारे यांना धमकी देण्याचे सत्र सुरू केले. यापूर्वी देखील त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार करण्यात आला होता, याबाबत कल्पेश पांगारे यांनी विविध स्तरावर तक्रारी केल्या आहेत, मात्र या तक्रारींची दखल आमदारांच्या दबावामुळे घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर पाढाच पिंपळवाडी गावचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला. ग्रामपंचायत पिंपळवाडी हे गाव आमदार गोगावले यांचे मूळ गाव आहे. या गावामध्ये त्यांचे घर असले तरी ते गावातील मतदार नाहीत, मात्र ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये त्यांचा सतत हस्तक्षेप सुरू आहे. ग्रामपंचायती मधील बेकायदेशीर कामाच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल दिनांक ३० एप्रिल २०२३ रोजी आमदार गोगावले यांच्या समर्थकांनी संपूर्ण कुटुंबाला गंभीररीत्या मारहाण केली होती व गावातील इतर लोकांवर खोटे आरोप करत गुन्हा दाखल केला होता. ही बाब इथेच थांबली नाही तर जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. महाड तालुक्यातील पिंपळवाडी गाव हे आमदार गोगावले यांचे असल्याने आमदार गोगावले यांनाच मतदान करायचे, नाहीतर वाळीत टाकण्याची आणि त्यांचे हस्तक गुंड घरोघर जाऊन जीवे मारण्याची धमकी देतात असा गंभीर आरोप पांगारे यांनी यावेळी केला आहे.
महाड तालुक्यातील पिंपळवाडी गावचे उपसरपंच असलेले कल्पेश वंदना बाबू पांगारे हे तरुण आणि शिक्षित आहेत. पिंपळवाडी गावामध्ये ग्रामपंचायत स्तरावर सुरू असलेल्या भ्रष्ट कामाबाबत त्यांना कायम चीड आहे. यामुळे त्यांनी कायम याबाबत आवाज उठवला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यांचा आवाज दाबण्यासाठी आमदार गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी सत्र सुरू करण्यात आले. या धमक्यांना कंटाळून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला होता. या प्रवेशाचा राग देखील मनात धरून गावातील लोकांना भडकावण्यात आले आणि उपसरपंच पदाचा राजीनामा मागण्यात आला. जे या ग्रामपंचायतीचे मतदाराच नाहीत त्यांना राजीनामा मागण्याचा काय अधिकार असा सवाल देखील कल्पेश पांगारे यांनी उपस्थित केला आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1
महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोगावले यांच्या गुंडगिरीने मरण्यापेक्षा राष्ट्रपतींनी इच्छा मरण द्यावे अशी मागणी त्यांनी १६ मार्च 2024 रोजी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे केल्याचे देखील पांगारे यांनी सांगितले. अनेक प्रशासन दबावाखाली असल्याने ते याबाबत कोणतीच कारवाई करत नाही यापुढे जर कारवाई झाली नाही तर आपण जून 2024 महिन्यात आमदार गोगावले यांच्या खरवली ग्रामपंचायत मधील ढालकाटी येथील घरासमोरच कुटुंबासह आत्मदहन करू, असा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे.
महाड तालुक्यातील पिंपळवाडी गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेचे काम सुरू असताना शाळेच्या जुन्याच विटा पुन्हा वापरण्यात आल्या होत्या. याबाबत आपण लेखी तक्रार केली होती. मात्र तू तक्रार करणारा कोण, असा जाब विचारून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असे पिंपळवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच पांगारे यांनी सांगून २४/३/२०२४ रोजी पिंपळवाडी गावदेवी मंदिरात ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये आमदार गोगावले यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देत उद्याच्या उद्या उपसरपंच पदाचा राजीनामा दे नाहीतर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी दिली होती. याबाबतचे कॉल रेकॉर्ड आणि मोबाईल चित्रफीत, व्हाईस रेकॉर्ड आपल्याकडे असल्याचा दावा देखील पांगारे यांनी केला आहे.
Also Read : भारतात 11 एप्रिलला ईद-उल-फित्र साजरी होणार
पिंपळवाडी गावचे उपसरपंच पांगारे यांनी आज पत्रकार परिषद मध्ये केलेल्या दाव्यामुळे रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली असून प्रशासकीय यंत्रणा आता कोणती कारवाई चालू करते याबाबत राजकीय निरीक्षकांकडून तर्कवितर्क लढविले जात आहेत.