(लांजा)
सामायिक जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात लाकडी काठीने प्रहार करत जखमी केले. ही घटना लांजा तालुक्यातील भांबेड – गोसावीवाडी येथे सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी मोठ्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांबेड गोसावीवाडी येथील विश्वनाथ नारायण गोसावी (६६) आणि त्यांचा मोठा भाऊ विष्णू नारायण गोसावी (८०) यांच्यामध्ये गेली अनेक वर्षे वडिलोपार्जित सामायिक जमिनीच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. दोघे भाऊ एकमेकांशी बोलत नाहीत. सोमवारी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या दरम्यान विश्वनाथ यांची पत्नी तनिता या घरासमोरील तुळशीला दिवाबत्ती करीत होत्या. त्यावेळी विष्णू गोसावी हे दारुच्या नशेत भावजयीला ‘तुम्ही देव देवस्की करता,’ असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच मारहाण केली. त्याचवेळी विश्वनाथ गोसावी हे तिथे भांडण सोडविण्यासाठी आले. त्यावेळी विष्णू गोसावी यांनी त्यांच्या डोक्यात बांबूच्या काठीने प्रहार केला. यामध्ये ते जखमी झाले असून, वनिता गोसावी किरकोळ जखमी झाल्या आहेत.
याही विश्वनाथ गोसावी यांच्यावर उपचार केल्यानंतर मंगळवारी त्यांनी पत्नीसह पोलिस स्थानकात येऊन फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लांजा पोलिसांनी विष्णू गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल दिनेश आखाडे हे करत आहेत.