(रत्नागिरी)
शहर पोलीस ठाण्यात कार्यरत मेजर प्रमोद उर्फ पम्या शामराव गायकवाड यांचे अंदाजे 52 व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. प्रमोद यांचा कोरोना महामारीच्या कालावधीत अपघात झाला होता. अपघातानंतर स्थिरस्थावर होण्यापूर्वीच त्यांचे सोमवारी रात्री निधन झाले.
गेली 28 वर्ष पोलीस खात्यात सेवा बजावत होते. प्रमोद गायकवाड यांची पोलीस दलातील अत्यंत हुशार पोलीस म्हणून ओळख होती. पोलीस दलातील सेवा बजावत असताना प्रत्येकाशी आपलेपणा जपून त्यांनी रत्नागिरीसह राज्यभर ओळख निर्माण केली होती. एखाद्या गुन्ह्याची सहज उकल करण्यात त्यांचा हातखंडा होता.
दोन वर्षापूर्वी प्रमोद हे आपले कर्तव्य बजावून घरी परतत असताना गयाळवाडी येथे त्यांच्या गाडी समोर उनाड गुरे आल्याने अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर ते आजारी होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत असताना त्यांच्या काल राहत्या घरी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. प्रमोद गायकवाड यांनी एक्झीट घेतल्याचे समजताच त्यांच्या मित्रपरिवारासह अनेकांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या निधनाची आज बातमी सर्वत्र पसरली. पोलीस दलासह अनेकांनी सोशल मीडिया तसेच आपल्या व्हाट्सअप स्टेटसवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.