अभिनेता आमिर खान याच्या ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री सुहानी भटनागर हिचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘दंगल’मध्ये लहान बबिता फोगटची भूमिका सुहानीने साकारली होती. सुहानी काही दिवसांपासून आजारी होती. सुहानीवर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र अनेक प्रयत्न करूनही डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत आणि सुहानीने अवघ्या 19 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
सुहानीच्या निधनाने संपूर्ण बॉलीवूड दु:खी झाले असून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुहानी फरिदाबादमध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. काही दिवसांपूर्वी तिचा एक अपघात झाला होता. त्यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना तिला काही औषधे देण्यात आली होती. मात्र, याच औषधांची रिअॅक्शन झाली. सुहानीच्या संपूर्ण शरीरात पाणी झाले. शरीरात पाणी झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचे निधन झाले.
सुहानी भटनागरने 2016 मध्ये रिलीज झालेल्या आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनयासोबतच सुहानीला गाण्याची आणि नृत्याची खूप आवड होती. या चित्रपटाशिवाय सुहानीने अनेक जाहिराती केल्या होत्या. मात्र, दंगलच्या माध्यमातूनच तिला लोकप्रियता मिळाली आणि ती लोकांच्या पसंतीस उतरली. तिच्या निरागसपणाने आणि अभिनयाने चाहत्यांनी तिचे कौतुक केले होते. दंगल चित्रपटातनंतर तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नव्हते.
दंगल चित्रपटात सुहानीने आमिर खानची धाकटी मुलगी ज्युनिअर बबीता फोगाटची भूमिका साकारली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त ती अनेक टिव्ही जाहिरातींमध्ये दिसून आली होती. मात्र, त्यानंतर तिनी सिनेक्षेत्रातून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. व अभ्यासावर पूर्णपणे लक्ष्य केंद्रित केले होते. तिने तिच्या अनेक मुलाखतीतदेखील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच चित्रपटात पुन्हा काम करेल, असं म्हटलं होतं. सुहानी सोशल मीडियावरदेखील जास्त अॅक्टिव्ह नव्हती. तिची शेवटची पोस्ट 25 नोव्हेंबर 2021 रोजी केली होती. या फोटोंमध्ये सुहानीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोकही आश्चर्यचकित झाले होते. तिच्या लूक्सची चर्चाही होत होती.