(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि अखत्यारीत असलेल्या संस्कार समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे “वर्षावास” या धार्मिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ रविवार दिनांक २१ जुलै रोजी आषाढी पौर्णिमेच्या पवित्र दिनी होणार असून हा कार्यक्रम रत्नागिरी शहरातील आंबेडकरवाडी बुद्ध विहार येथे सकाळी 11 ते दुपारी २ या वेळेत घेण्यात येणार आहे. तसेच रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या वर्षावास धार्मिक कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी, धम्म बंधुभगिनी, बौद्धाचार्य आणि श्रामणेर यांचे करिता विशेष धार्मिक प्रबोधन करण्यात येणार आहे.
तसेच बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीच्या 38 गाव शाखांमधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना आपआपल्या गावशाखांचे कामकाज कशाप्रकारे अपडेट असायला पाहिजे व कशा पद्धतीने पदाधिकारी म्हणून कार्यरत असायला हवे, याविषयी बहुमोल मार्गदर्शन करण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती मुंबईच्या मुख्य समितीचे उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार (धामणकर) आणि अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठल जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीचे उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सरचिटणीस सुहास कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, उपचिटणीस नरेंद्र आयरे आदींसह रत्नागिरी संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, सरचिटणीस रविकांत पवार आणि अन्य उपसमित्यांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या शुभारंभीय कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरीच्या संस्कार समितीचे सर्व बौद्धाचार्य व श्रामणेर आणि तालुक्यातील गाववार शाखांच्या प्रमुख पदाधिकारी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन रत्नागिरी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश रा. पवार आणि संस्कार समितीचे अध्यक्ष संजय आयरे यांनी केले आहे.