(खेड)
रस्त्यावर आलेल्या गायींना वाचविण्यासाठी ब्रेक लावल्यामुळे रस्त्याच्या बाजूला एसटी बस उलटून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. हा अपघात खेड-आंबवली मार्गावरील कुडोशी येथे गुरुवारी दुपारी झाला.
खेड बसस्थानकातून दुपारी तीन वाजता सुटणारी खेड-वडगाव बस (एमएच २०, बीएल ०४६१) घेऊन चालक बी. एम. घुगे आणि वाहक बी. एस. सोनकांबळे निघाले होते. आंबवली मार्गावर कुडोशी येथे अचानक रस्त्यावर आडव्या आलेल्या गायींना वाचविण्यासाठी चालक घुगे यांनी ब्रेक लावला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उलटून अपघात झाला.
नेहमी गर्दीने भरून जाणाऱ्या वडगाव गाडीच्या अगोदरच नांदिवली बस सुटल्यामुळे या गाडीला प्रवाशांची संख्या तुरळक होती. यामुळे अनर्थ टळला. मात्र, या अपघातात साक्षी भागुराम तांबे (वय १७, रा. किंजळे, ता. खेड) व दीक्षा गांजेकर (१७, रा. कांदोशी, ता. खेड) या दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांना नाणीज येथील श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे चालक सूरज हंबीर यांनी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघाताची माहिती मिळताच एसटी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना मदत केली.