जय जय रघुवीर समर्थ. उदंड कल्पांत झाला तरीही ब्रम्हाला नाश नाही. मायेचा त्याग करून शाश्वताला ओळखावे. देव म्हणजे सगुण अंतरात्मा. सगुणातून निर्गुणाचा बोध घ्यायचा. निर्गुणाच्या अनुभवाने विज्ञान समजते. कल्पनेच्या पलीकडचं जे निर्मळ आहे, तिथे मायारुपी मळ नाही. तिथे सगळे दृश्य खोटे होत जाते. जे होतं आणि निघून जातं, ते ते प्रत्ययाला येतं. जिथे होणं जाणं नाही ते विचारपूर्वक ओळखावं. एक ज्ञान एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान ही त्रिपुटी क्षीण होते त्याला विज्ञान म्हणायचं. वेदांत सिद्धांत आणि धादांत याची प्रचिती पहावी. निर्विकार तिथे सदोदित रहावे. ज्ञानदृष्टीने पहावे. पाहून अनन्य राहावे. याचेच नाव मुख्य आत्मनिवेदन आहे.
दृश्याला दृश्य दिसते, मनाला भास भासतो, मात्र परब्रह्म हे दृश्यभासाच्या पलीकडील अविनाशी असे आहे. पाहिलं तर ते दूर पळत पण परब्रम्ह हे सर्वांच्या सभाह्यांतरी आहे. त्याला अंत नाही ते अनंत आहे. त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. चंचल असते ते स्थिर होत नाही आणि निश्चल असते ते कधीही चळत नाही. आभाळ येत जातं गगनाला हालचाल नाही. जे विकारामुळे वाढते, मोडते, तिथे शाश्वतता कशी असेल? कल्पांत झाल्यावर सगळं बिघडतं. जे भ्रमिष्ट झाले, मायेच्या संभ्रमात पडले त्याला हे अफाट चक्र कसे उलगडेल?
भीड असेल तर त्याला काही व्यवहार समजणार नाही, भीड असेल तर सिद्धांत समजणार नाही, भीड असेल तर देव समजणार नाही. वैद्याची प्रचिती येणार नाही आणि भिड ही त्याला काही मोडता येत नाही, मग रोगी वाचणार नाही असे जाणावे. ज्यांनी राजा ओळखला तो भलत्याला राव म्हणणारा नाही. ज्याने देव ओळखला तो स्वतःच देव होईल. ज्याला माईक गोष्टींची भीड आहे तो काहीही बोलू शकत नाही. विचार केला तर सगळं काही उघड आहे. भीड ही मायेच्या अलीकडे आहे. परब्रम्ह पलीकडे आहे. पलीकडे-अलीकडे सगळे असते. खोट्याची भीड धरणे, आणि भ्रमाने भलतेच करणे हे विवेकाचं लक्षण नाही. सगळे खोटं जे आहे ते सोडून द्यावं. आहे ते अनुभवाने ओळखावं. मायेचा त्याग करून परब्रम्ह जाणून घ्यावं. मायेचे लक्षण मी पुढे निरूपण करीत आहे ते लोकांनी ऐकलं पाहिजे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास नववा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक 14 समास दहा माया निरूपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. माया दिसते परंतु नष्ट होते. वस्तू दिसत नाही परंतु नष्ट होत नाही. माया सत्य वाटते परंतु ती मिथ्या असते. करंटा माणूस उताणा पडून नाना प्रकारच्या कल्पना करतो, पण घडत काहीच नाही. तशी कल्पना असते. माया द्रव्य दारा स्वप्नाचं वैभव, नाना प्रकारचे विलास, त्याचे हावभाव अशा खोट्या क्षणिक गोष्टींमध्ये अडकतो, तशी माया असते. आकाशामध्ये नाना प्रकारची गंधर्वनगरे दिसतात तशी माया असते. बहुरूप्याची लक्ष्मी खरी आहे असे वाटते पण ती खोटी असल्याची प्रचिती लगेच येते तशीच ही माया आहे. दसऱ्याचे सुवर्ण लुटा असे लोक म्हणतात पण ते काटे असतात. असे सगळीकडे ते दिसतं तशी माया असते.
मृत्युनंतर महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढवणे, स्मशानात जाऊन रडणं तशी माया असते. ते राखेला लक्ष्मी म्हणतात. गर्भपात थांबवणारी मंत्रित दोरी तिला लक्ष्मी म्हणतात, तिसरी नाममात्र लक्ष्मी. तशी माया असते. एखादी नारी बाल विधवा असते तिचं नाव जन्मसावित्री असतं. कुबेर नावाचा माणूस घरोघरी भीक माग]तो. तशी माया. दशावतारातील कृष्ण आणि त्याच्या मनामध्ये जुन्या वस्त्रांची तृष्णा! नाव अमृताची नदी, पियुश्ना आणि साधी नदी.. तशी माया असते. बहुरूप्यामधील रामदेवराय आणि दाखवितो हावभाव, सोंग श्रीमंत महाराजाचे आणि पैसे मागतो, देव्हाऱ्यात अन्नपूर्णा आणि घरात अन्नच मिळेना.. नाव सरस्वती आणि थापते गोवऱ्या .. असे मायेचे वर्णन समर्थ करीत असून पुढील वर्णन ऐकू या पुढील भागात.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127