जय जय रघुवीर समर्थ. भगवंताच्या रंगांमध्ये असा रंगला की त्याला आणखी काहीही नको असते. स्वेच्छेने तो ध्यान कीर्ती प्रताप वर्णन करतो. नाना ध्याने, नाना मूर्ती, नाना प्रताप, नाना कीर्ती, त्याच्यापुढे मनुष्याची स्तुती तृणाप्रमाणे वाटते, असा जो भगवदभक्त असतो तो संसारापासून विरक्त असतो. त्याला साधू जन मुक्त मानतात. त्याच्या भक्तीचे कौतुक होतं. त्याला प्रासादिक असं नाव दिल जात. तो सहज बोलला तरी त्यातून विवेक प्रकट होतो. त्याने केलेल्या निरुपणामुळे श्रोत्यांचे अंतकरण शांत होते हे कवित्व लक्षण आहे.
कवित्व निर्मळ असावं, कवित्व सरळ असावं, कवित्व प्रांजळ असावं, त्यातून नीट अन्वय स्पष्ट व्हावा. कवित्वामध्ये भक्तीचे बळ असावे. कवित्वामध्ये गंभीर अर्थ असावा. कवित्व हे अहंकारापासून वेगळे असावे. कवित्व कीर्ती वाढवणारे असावे, कवित्व हे रम्य आणि गोड असावे. कवित्व प्रतापाचे वर्णन करणारे असावे, कवित्व सोपे असावे. कवित्व अल्परूप असावे. कवित्व सुलभ असावे. मृदू, मंजुळ, कोमल, भव्य, अद्भुत, विशाल, गौल्य, माधुरी, रसाळ भक्तीरसाने भरलेले असे कवित्व असावे. अक्षरबंध, पदबंध, नाना चातुर्य, प्रबंध, नाना कौशल्य, छंदातबद्ध, अनेक उपमा असलेले, नाना युक्ती, नाना बुद्धी, नाना कला, नाना सिद्धी, नाना अर्थ साधणारे कवित्व असावे. नाना साहित्यदृष्टांत, नाना तर्क, त्या तर्कांचे खंडन, नाना सिद्धांत, पूर्वपक्ष, नानागती, नानाविध व्युत्पत्ती, नाना मती, नाना स्फूर्ती, नाना धारणा, नाना कृती याला कवित्व असं नाव आहे. शंका, कुशंका, प्रत्युत्तरे, नाना काव्य शास्त्राचा आधार यांच्या योगाने संशयाचे निराकरण होते.
नाना प्रसंग, नाना विचार, नाना योग, नाना विवरण, नाना तत्त्वचर्चासार याच नाव कवित्व. नाना साधना, पुरश्चरणे, नाना तप, तीर्थाटणे, नाना संदेह दूर करणे याचं नाव कवित्व. ज्याच्यामुळे पश्चात्ताप होईल, लौकिक गोष्टींची आवड कमी होईल, ज्याच्यामुळे ज्ञान निर्माण होईल त्याचे नाव कवित्व. ज्याच्यामुळे ज्ञान प्रबळ होईल आणि वासना कमी होतील. भक्तिमार्ग कळेल त्याचे नाव कवित्व. ज्याच्यामुळे देहबुद्धी नष्ट होईल, भवसागर आटेल, ज्याच्यामुळे भगवंत प्रकट होईल त्याचं नाव कवित्व. ज्याच्यामुळे सद्बुद्धी जागृत होईल, पाखंडी मत भंग पावेल, विवेक जागृत होईल त्याचं नाव कवित्व. ज्याच्यामुळे सद्वस्तू माहिती होईल, मायेचा आभास नाहीसा होईल, भिन्नत्व नष्ट होईल त्याचे नाव कवित्व. ज्याच्यामुळे समाधान होईल, संसाराचे बंधन तुटेल, ज्याला सज्जन लोक मानतील त्याचे नाव कवित्व. असं कवित्व लक्षण सांगितलं ते असाधारण आहे. परंतु जिज्ञासा तृप्त करण्यासाठी थोडेफार निरूपण केले. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवित्व कला निरूपणनाम समास तृतीय समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127