जय जय रघुवीर समर्थ. सगुण भजन सोडेल तो ज्ञानी असला तरी देखील ईश्वराच्या राज्यात त्याच्या कृपेच्या अभावी अपयश मात्र येईल, म्हणून सगुण भजन सोडू नये. निष्कामपणे भजन केले तर त्याची तुलना त्रिलोक्याशी देखील होत नाही. सामर्थ्याशिवाय योग्यता नसेल तर निष्काम भजन होत नाही. कामनेमुळे फळ मिळते, मात्र निष्काम भजनामुळे भगवंत जोडला जातो. देवापाशी नाना फळे आहेत, पण फळ आणि भगवंत या दोन्हीमध्ये खूप मोठे अंतर आहे. म्हणून परमेश्वराचे निष्काम भजन करावे. निष्काम भजनाचे फळ अलौकिक आहे. त्याचे सामर्थ्य मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्याच्यापुढे मिळणाऱ्या फळांची तुलनाच करता येणार नाही.
भक्ताने मनामध्ये जे धरावे ते देव आपणच करतो त्यासाठी वेगळी प्रार्थना वगैरे करावी लागत नाही. निष्काम भजनाचे आणि ब्रह्मज्ञानाचे सामर्थ्य एक झाले की काळाला देखील ते आवरता येत नाही तिथे इतरांची काय कथा! म्हणून निष्काम भजन आणि वरती ब्रह्मज्ञान यांची तुलना करतात त्रिभुवन देखील त्याच्यापुढे उणे आहे. इथे बुद्धीचा प्रकाश फारसा महत्त्वाचा नाही, भक्तीमुळे आपोआप यश कीर्ती प्रताप वाढतात. निरूपणाचा विचार आणि हरीकथेचा गजर त्यामुळे प्राणीमात्र तरून जातो. निश्चयाचे समाधान नष्ट होत नाही तेथे आचार्यभ्रष्टता नसते आणि परमार्थ झाकून राहत नाही. सारासार विचार करणे, न्याय अन्याय अखंड पाहणे अशा प्रकारची बुद्धी हे भगवंताचे देणे असून ते कधीही कमी होत नाही. भक्त आणि भगवती एकच असून त्याला ती बुद्धी परमेश्वर देतो असे भगवदवचन आहे. “ददामि बुद्धी योगम तं येन मामुपयान्ति ते !” म्हणून सगुण भजन आणि वरती विशेष ब्रह्मज्ञान याच्यामुळे प्रत्याचे दुर्लभ असे समाधान जगामध्ये मिळते असं समर्थ सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सगुण भजन निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.
दशक १०, समास ८, प्रचीत निरुपण नाम समास
जय जय रघुवीर समर्थ. आता प्रचितीची लक्षणे ऐका. प्रचिती पाहतील ते शहाणे, बाकीचे प्रचीती नसल्याने वेडे दैन्यवाणे. नाना रत्ने, नाना नाणी यांची परीक्षा न करता घेतले तर हानी होते. प्रचिती नसेल तर निरुपणाला बसू नये. घोडे, शस्त्र आजमावून पाहिले पाहिजे,चांगले वाटले असे प्रचिती आली तर मगच जाणत्या माणसाने ते घेतले पाहिजे. बीज उगवेल असे पाहावे, मगच ते पैसे देऊन विकत घ्यावे. प्रचिती आली तरच निरूपण ऐकावे. देहामध्ये आरोग्य आले असा लोकांचा अनुभव आला तरच मग औषधाची मात्रा अवश्य घेतली पाहिजे. अनुभव नसताना औषध घेणे म्हणजे चांगले असलेले आरोग्य बिघडवणे.
अंदाजाने कार्य करणे म्हणजे मूर्खपणा. अनुभवाला आलं नाही आणि सोन्याचे दागिने केले की मग आपल्याला हातोहात फसवलं जाते. शोधून पाहिल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागणार नाही, योग्य होणार नाही, मात्र प्राणांतिका अवस्था येईल म्हणून अंदाजपंचे कार्य चांगल्या माणसांनी कधीही करू नये. उपाय पाहिल्यावर अपाय होतो. पाण्यातील म्हशीची खरेदी करायची ही बुद्धी खोटी. शोधले नाही तर मग नाराज व्हावे लागेल. विश्वासाने घर घेतले, असे कोणीही ऐकलं नाही, लुच्च्या लोकांनी फसवलं तर त्याचा शोध घेतला पाहिजे. शोधल्याशिवाय अन्न वस्त्र घेणे म्हणजे प्राणाला मुकणे.
खोट्याचा विश्वास धरणे हा मूर्खपणा आहे. चोराची संगत धरली तर घात होईल आणि फसवणूक होईल. खोटी नाणी करणारे, तांब्याचे सोने करणारे, कोणी नवीन नाणी करून देणारे असे कपट परोपरी शोधून पाहिले पाहिजे. दिवाळखोरांचा पसारा पाहिल्यावर वैभव उदंड दिसते पण ते सगळे थोतांड असते आणि त्याच्यामुळे फजिती होते. त्याप्रमाणे अनुभवाशिवाय ज्ञान असले तरी त्यामुळे समाधान होणार नाही. अंदाजपंचे काम केल्याने अनेकांचे नुकसान झालेले आहे. मंत्र यंत्र उपदेश केले आणि हजार अज्ञानी प्राणी त्याच्यामध्ये गोवले. दुखणाईत माणसाला झाकून मारण्यासारखी ही स्थिती होईल, असा सावधगिरीचा इशाराच समर्थ देत आहेत.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1