जय जय रघुवीर समर्थ. मूळ माया चंचल. ज्याप्रमाणे गगन अंतराळ चहूकडे असते त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म निश्चळ. दृश्य आलं आणि गेलं पण ज्याप्रमाणे आकाश सगळीकडे तुम्हाला दिसतं तसच ब्रह्म आहे. जिकडे पहावे तिकडे अपार कुठेही पार नाही.. कुठे असे एक जिन्सी, त्याच्यासारखे स्वतंत्र दुसरे नाही. विवेकाने दृश्य ब्रम्हांड ओलांडून आकाशाशी तन्मय झाल्याने आपल्या ठिकाणचे चांचल्य जणू नव्हतंच असा अनुभव येईल. वृत्तीला निवृत्त करण्याचे हे साधन आहे. अशाप्रकारे ते अवलोकावे. चंचल व्यापकाच्या नावे शून्यच तिथे दिसते. विवेकाद्वारे दृश्य काढून टाकलं तर परब्रम्ह हे सगळीकडे कोंदाटलेले आहे असं समजेल. कोणालाही त्याचे अनुमान करता येत नाही. आकलन होत नाही. वर खाली सगळीकडे पाहता निर्गुण ब्रह्म जिकडेतिकडे आहे. त्याचा अंत पाहण्यासाठी मन कुठे कुठे धावेल? दृश्य चळत नाही, ब्रह्म चळत नाही. दृश्य कळते, ब्रह्म कळत नाही. ब्रह्म कल्पनेला देखील आकलन होत नाही. कल्पना म्हणजे काहीच नाही. ब्रह्म तर जिथे जिथे आहे.
महावाक्याचा अर्थ तो मीच आहे. म्हणजे तो माझे दृश्य नव्हे. परब्रम्हाएवढं थोर नाही. श्रवणासारखं साधन नाही. कळल्याशिवाय काहीच समाधान नाही. मुंगी सारखं हळू हळू जायचं, किंवा पक्षासारखे थेट फळ गाठायचे.. साधकाने मनन केले म्हणजे बरे.. परब्रह्मासारखं दुसरं काहीच नाही आणि स्तुती उत्तर परब्रह्मामध्ये नाही. असं परब्रह्म एकजन्सी आहे. त्याच्याशी कशाचीही तुलना होऊ शकत नाही. जे महानुभाव पुण्यराशी आहेत तेच त्याचे वर्णन करू शकतात. चंचलामुळे दुःख प्राप्ती होते. निश्चळाएवढी विश्रांती नाही. निश्चलाच प्रत्यय पाहतात ते महानुभाव. मुळापासून शेवटपर्यंत विचारणा केली तरी प्रत्यय व्हावा असा मनानं निश्चय केला त्यालाच ते मिळते. कल्पनेची सृष्टी झाली. त्रिविधप्रकारे त्रिगुणांपासून ती भासली. तीक्ष्ण बुद्धीने ते मनामध्ये आणलं पाहिजे. मूळ मायेपासून त्रिगुण निर्माण झाले, हे मुख्य लक्षण. पाच भूतांचा तो ढोबळ गुण दिसतो त्यावरून हे स्पष्ट होते.
पृथ्वीपासून चारी खाणी, चार प्रकारची वेगवेगळी करणी, सकळ सृष्टीची चाल इथून पुढे म्हणजे ब्रह्मप्राप्ती नंतर नाही. सृष्टीचे त्रिविध लक्षण विषद करताना श्रोत्यांनी तिकडे लक्ष दिले पाहिजे. परावाचा जशी स्फुर्तीमय त्याप्रमाणे एकोहं बहुस्याम ही आद्य स्र्फुर्ती, म्हणजेच मूळमाया होय. मूळमायेतच सृष्टीचे सूक्ष्म बीज आहे. जड पदार्थात चेतना निर्माण करते म्हणून त्याला चैतन्य म्हणतात. सूक्ष्म रूप प्रत्यक्ष दाखवता येत नाही, ते चिन्हावरून समजावं लागतं. प्रकृती पुरुषाचा विचार केला तर अर्धनारी नटेश्वर असं त्याला म्हणतात. अष्टधा प्रकृतीचा विचार सर्व काही आहे. महतत्त्व हे मूळमायेचे नाव आहे, त्याचा संकेत आहे, कारण तिच्यात त्रिगुण गुप्त रूपाने असतात. जिथून गुण प्रगटतात तिला त्यावेळी गुणक्षोभिणी म्हणतात. त्रिगुणाची रूपे समजतात ते साधू धन्य होत. हे त्रिगुण अप्रगट स्थितीत सौम्यावस्थेत एकसारखे वाटत असल्याने त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात. सूक्ष्म संकेत लोकांना अगम्य आहे.
मूळ मायेपासून त्रिगुण हे चंचल असे एकदेशी लक्षण असून प्रत्यय पाहिला की मग नंतर ती खुण मनाला पटते. पुढे पंच भूतांची बंडे सप्त द्वीप नवखंड वसुंधरेवर उदंड वाढलेली आहेत. त्रिगुणापासून पृथ्वीवर दुसरा एक प्रकार आणि त्यातून तिसरा प्रकार जन्म घेतो. पृथ्वी हे नाना जीनसांचे बीज आहे. तिथे अंडज, जारज, श्वेतज, उद्वीज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झालेल्या आहेत. खाणी वाणी होतात जातात परंतु पृथ्वी जगतामध्ये आहे तशीच आहे. त्यात उदंड प्राणी येतात जातात, असं समर्थ सांगतात. इतिश्री दासबोधे सृष्टी त्रिविध लक्षण निरुपण नाम समास द्वितीय समाप्त.
जय जय रघुवीर समर्थ.
पद्माकर देशपांडे
(निरूपणकार पत्रकार / लेखक)
मोबा. 9420695127