(मुंबई)
‘गुवाहाटीसाठी भास्कर जाधव बॅग घेऊन तयार होते’, असा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी शनिवारी केला होता. योगेश कदमांच्या या दाव्यानंतर आता वडील रामदास कदमांनी देखील मोठा दावा केला आहे. ‘भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत गेले होते…’, असा मोठा गौप्यस्फोट रामदास कदमांनी केला आहे. आता भास्कर जाधव म्हणणार मी गेलोच नाही, मी निष्ठावान आहे. पण एकनाथ शिंदेंना खासगीत विचारलंच तरी ते देखील तुम्हाला सांगतील, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.
दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उठाव केला होता तेव्हा भास्कर जाधव हे शिंदे गटात येणार होते. परंतु, त्यावेळी भाजपने विरोध केल्यामुळे इच्छा असूनही भास्कर जाधव यांना अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरावे लागले, असा खळबळजनक गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी उठाव केला तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार सुरतमध्ये गेले होते. भास्कर जाधव हे गुजरातच्या सीमेपर्यंत येऊन माघारी फिरले होते. भास्कर जाधव हे सुरतच्या जवळ पोहोचले होते तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना सांगण्यात आले की, तुम्हाला आमच्यासोबत घेता येणार नाही. भाजपकडून तुम्हाला आमच्या गटात घेण्यास विरोध केला जात आहे. भास्कर जाधव यांनी मोदींची केलेली नक्कल आणि अधिवेशनावेळी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यामुळे त्यांच्या शिंदे गटातील समावेशाला विरोध करण्यात आला, अशी माहिती माझ्याकडे असल्याचे रामदास कदम यांनी म्हटले.
भास्कर जाधव यांना त्यावेळी शिंदे गटात येण्याची इच्छा होती. पण शिवसेना नेतृत्त्वाने त्यांना सांगितले की, थोडे दिवस थांबा, आम्ही भाजपची समजूत घालतो. पण भाजपने नंतरही भास्कर जाधव यांच्या समावेशाला विरोध कायम ठेवल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. त्यामुळेच भास्कर जाधव आता उद्धव ठाकरे यांना तुम्ही भाजपसोबत गेल्यास मी तुमच्यासोबत येणार नाहीत, असे म्हणत आहेत.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी एबीपी माझाने एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत रामदास कदम यांनी खळबळजनक दावा केला आहे. दरम्यान भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांना सांगितले की, तुम्ही थोडे दिवस थांबा, आम्ही त्यांच मन वळवायचा प्रयत्न करतो. म्हणून सुरतच्या बॉर्डवरून भास्कर जाधव मागे गेले का? याबाबत खात्री केली पाहिजे. उद्या समजा उद्धव ठाकरे भाजपमध्ये गेले तर यांना घेतील की नाही यात शंका आहे. कारण भास्कर जाधवाना वाटतंय उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय ना. भास्कर जाधवाना अचानक साक्षात्कार झाला का? की उद्धव ठाकरे भाजपसोबत चालले आहेत. त्यांना कुठेतरी, काहीतरी कळतंय म्हणून ते बोलतात, असा खळबळ उडवून टाकणारा दावा देखील रामदास कदम यांनी केला आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1