(चिपळूण)
नुकतेच नवे कायदे तयार करण्यात आले. या नव्या कायद्याची अंमलबजावणी दिनांक १ जुलैपासून सुरू करण्यात आली असून फौजदारी कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद चिपळूण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. यात एका वृध्दाला लाकडाच्या रीपीने मारहाण व शिवीगाळ केली. याबाबत गणेश मोहिते (नवी वसाहत, कापसाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षापासून सुरु असलेल्या वादातून वसंत शंकर पंधरे (66, कापसाळ) या वृध्दाला गणेश मोहिते (नवी वसाहत, कापसाळ) याने लाकडी रिपेने मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कापसाळ येथे घडली. याप्रकरणी मोहिते याच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत पंधरे व गणेश मोहिते यांच्यात दोन वर्षांपासून वाद आहेत.
सोमवारी सकाळी 11 वाजता पंधरे हे त्यांच्या भाच्याकडे जात होते. ते कापसाळ रस्त्याने जात असताना मोहिते याने त्यांना बोलावले. मोहिते हा फर्निचरच्या दुकानात काम करतो. पंधरे तेथे आले असता मोहिते याने त्यांना लाकडी रिपेने मारहाण केली. यावेळी त्या रिपेला खिळा असल्याने तो पंधरे यांच्या पायाला लागल्याने ते यात जखमी झाले. तसेच मोहिते याने शिवीगाळ केली. याप्रकरणी मोहिते याच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात नव्या कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 118 (1), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.