(गुहागर)
गुहागर तालुक्यातील बोऱ्या बंदरावर विसावायला जाणारी हर्णे बंदरातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली बोट तांडेलला आलेल्या डुलकीमुळे खडकावर चढून अडकली. सुदैवाने, मोठी दुर्घटना घडली नाही. बोटीसह तांडेल, खलाशी असे सातहीजण सुखरूप आहेत. ही घटना गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी देवीच्या डोंगरालगत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुरुवारी दिवसभर बोट काढण्याच्या प्रयत्नाला यश आलेले नाही; मात्र बोटीमधील इंजिन काढण्यात आले असून यामध्ये सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील हरेश वासुदेव कुलाबकर यांच्या मालकीची जानकी इंडिया महाराष्ट्र ४ एमएम १६६९ हो मच्छीमार बोट आहे. बुधवारी रात्री हर्णे बंदरातून गुहागरच्या समुद्रामध्ये जोराच्या वाऱ्यामुळे बोऱ्या बंदरात विसावण्यासाठी येत होती. बोटीवर नरेश पालेकर हे तांडेल तर ७ खलाशी होते. समुद्रातून बोट बोऱ्या बंदरात आणताना देवीच्या डोंगराच्या बाजूने आणावी लागते. त्याप्रमाणे बोट आणत असताना तांडेलला डुलकी आली आणि बोटीच्या स्टेअरिंगची साखळी तुटल्याने बोट बेट डोंगराच्या कडेला असलेल्या खडकावर जाऊन अडकली. या वेळी सुरू असलेल्या भरतीमुळे बोट चेट खडकावर जाऊन अडकली. भरतीमुळे खडकाचा दणका बसला नाही. यामुळे बोट लगेच फुटली नाही. याचा फायदा घेत प्रसंगावधान राखून तांडेलसह ७ खलाशी सुखरूप खडकावर उतरले आणि आपला जीव वाचवला.