(रत्नागिरी)
कोकण विभागात वीज बिलांची वसुली ही अत्यंत चांगल्या पद्धतीने होत असे. त्यामुळेच या विभागात वीज भर नियममनाचे चटके सहसा वीज ग्राहकांना सोसावे लागत नाहीत. मात्र आता ही प्रथा बंद पडण्याची शक्यता सध्याच्या परिस्थितीवरून निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील वीज बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील एक लाख 5 हजार 383 वीज ग्राहकांकडे आता २३ कोटी ८८ लाखांपर्यंत वीज बिल थकबाकी आहे. ही थकबाकी वेळेत वसूल झाली नाही तर वीज मंडळाच्या निकषानुसार रत्नागिरी भारनियमनाच्या टप्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज थकबाकी वेळेत भरा अन्यथा भारनियमनाचे चटके सोसायला तयार रहा, अशी स्थिती रत्नागिरी जिल्ह्यासमोर उभी ठाकली आहे.
विजेचा वापर आणि वीज बिलांची वसुली याबाबत राज्यभरात कोकणचा अव्वल नंबर नेहमी असायचा. त्यामुळे कोकण विभागात भारनियमन करावे लागत नसे. मात्र यावेळी ही वीज बिल थकबाकीची विचित्र स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. थकबाकीच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपन्यांकडून जोरदार मोहीम राबविली जात आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या वाहनाद्वारे फिटे अंधाराचे झाले जाळे, झाले मोकळे आकाश यासारख्या गाण्यांच्या धून वाजवून वीज ग्राहकांना थकबाकी भरण्याबाबतचे आवाहन केले जात आहे. तसेच थकबाकी न भरल्यास वीज खंडित होऊ शकते, असा इशाराही दिला जात आहे. अद्याप वीज वसुली मोठ्या प्रमाणात होणे बाकी आहे.
थकीत आकडेवारी
जिल्ह्यातील ८२ हजार ३४५ घरगुती वीज ग्राहकांकडून ६ कोटी ५० लाख रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. ८२७६ वाणिज्य ग्राहकांकडून २ कोटी ४४ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. १६९० पथदीप ग्राहकांकडून ६ कोटी ८६ लाख एवढी थकबाकी शिल्लक आहे. ८४३२ कृषी पंप ग्राहकांकडून दोन कोटी ८५ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. ९९६ औद्योगिक ग्राहकांकडून १ कोटी ८ लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे. ११७५ सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहकांकडून २ कोटी ५५ लाख रुपये थकबाकी वसूल होणे बाकी आहे. एकूण ग्राहक १ लाख ५ हजार ३९३ असून २३ कोटी ८८ लाखांपर्यंत वीज बिल थकीत आहे.
अधिकाऱ्यांची माहिती
विज बिल वेळेत न भरल्यामुळे थकबाकीचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज खंडित होऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि तातडीने ऑफलाइन किवा ऑनलाईन वीज बिले भरावीत असे आवाहन रत्नागिरीचे अधीक्षक अभियंता स्वप्निल काटकर यांनी केले आहे. दरम्यान वीज बिलांची थकबाकी पाहता भार नियमनाची शक्यता लक्षात घेऊन त्या दृष्टीने चाचणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठरलेल्या कालावधीत वीज थकबाकीची वसुली न झाल्यास भारनियमानाचा फटका रत्नागिरीकर ग्राहकांना बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.