(दापोली)
घरातील पिठाच्या गिरणीत दळण दळताना तोंडाला बांधलेली ओढणी गिरणीच्या पट्टयात अडकून महिलेच्या गळ्याला फास लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत त्या महिलेचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. ही घटना दाभोळ-तेलीवाडी (ता. दापोली) येथे शुक्रवारी घडली. राजेश्री राजेंद्र राऊत (४५) असे महिलेचे नाव आहे. राजेश्री राऊत यांच्या घरामध्ये सागर फ्लोअर मिल नावाची पिठाची गिरणी आहे. शुक्रवारी सायंकाळी ९:४५ वाजण्याच्या दरम्यान त्या गिरणीत दळणाचे काम करत होत्या.
दळणाचे पीठ नाकात किंवा तोंडात जाऊ नये यासाठी त्यांनी तोंडाला ओढणी बांधली होती. दळण दळण्याचे काम करत असताना त्या खाली वाकल्या आणि त्यांच्या तोंडावरील ओढणीचा काही भाग गिरणीच्या पट्टयात अडकला. पट्ट्याच्या अतिवेगामुळे ओढणी जोरात ओढली गेली आणि त्यांच्या गळ्याभोवती फास लागला. हा फास एवढ्या जोरात आवळला गेला की, त्यांच्या श्वासच बंद झाला आणि त्यांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. या घटनेची नोंद दाभोळ पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू करण्यात आली आहे. अशी घटना प्रथमच घडली असून, या दुर्दैवी प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.