(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील चिखली येथे पडीक भूकंप शेडमध्ये बिबट्या मादीची पिल्ले दिसून आली. यावरून या भागात बिबट्याचा वावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. सापडलेली पिल्ले वनविभागामार्फत पुन्हा एकदा सुखरूप आपल्या आईच्या कुशीत सोडण्यासाठी वनविभागाला यश आले आहे.
तालुक्यातील चिखली येथे एका बंद भूकंप शेडमध्ये निवृत्त कर्मचारी अशोक महादेव स्वामी व शशिकांत डिंगणकर रविवारी दुपारनंतर काही कामासाठी गेले होते. त्यांना ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे आजूबाजूला पाहिले असता त्याना बिबट्या जातीची तीन पिल्ले आढळून आली. याबाबतची त्यांनी तातडीने वनविभागाला दिली.
त्यानंतर वनविनभागाचे विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांच्यासह वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पिल्लांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामस्थाना सूचना देण्यात आल्या. या ठिकाणी वनविभागाच्यावतीने कॅमेरे लावण्यात आले, जेणेकरून बिबट्या मादीच्या हालचाली व पिल्लांची सुरक्षितता यावर लक्ष ठेवता येईल. पहिल्या दिवशी बिबट्या जातीच्या मादीने आपल्या तीनपैकी दोन पिल्लांना जंगलात सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कॅमेऱ्यातील हालचालीवरून स्पष्ट झाले. तर एका पिल्लाला दुसऱ्या दिवशी मादीने जंगलात हलविले. यानंतर वनविभागाने सुटकेचा निःश्वास घेतला.
ही सर्व मोहीम विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट, परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवरुख तौफिक मुल्ला,वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे, अरुण माळी पोलीस पाटील रुपेश कदम यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
परिसरात भीतीचे वातावरण
या परिसरात गवा, बिबटे असे अनेक जंगली प्राणी दिवसाढवळ्या दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही पिल्ले दिसल्यानंतर येथील आसपासच्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी शेंबवणे येथील जंगलात एका गवा मादीने पिल्लाला जन्म दिल्याचे काही गुरख्यांच्या निदर्शनास आले असल्याची चर्चा सुरू होती. मात्र अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाला तात्काळ कळवावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.