(जैतापूर / वार्ताहर)
रयत क्रांती संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शिफारशीनुसार आणि त्यांचे खासगी सचिव आदिनाथ कपाळे यांच्या विशेष प्रयत्नातून तुळसवडे – सोलीवडे गावामध्ये मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. विशेष म्हणजे गावातील ज्येष्ठ व्यक्तींकडून विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. सदरची विकासकामे ही ग्रामविकास विभागाच्या २५१५ अंतर्गत आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन योजनेच्या जन सुविधा अंतर्गत मंजूर करण्यात आली आहेत.
सदर मंजूर कामांमध्ये मौजे तुळसवडे येथील श्री. आदिनाथ जैन मंदिर सभागृहाभोवती सुशभीकरण करणे, मौजे सोलीवडे येथील श्री. वावळादेवी मंदिराच्या सभागृहाभोवती सुशोभीकरण करणे, धामणे सार्वजनिक बोर ते दिनेश धोपटे घर रस्ता मजबुतीकरण करणे तसेच गराटेवाडी येथील तोस्कर घर ते रामाने घर येथील रस्ता खडीकरण करणे इत्यादी कामांचा समावेश होता.
आदिनाथ कपाळे हे कार्यक्रम प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना बोलत होते की “आतापर्यंत आम्ही गावविकास पॅनलच्या माध्यमातून गावांना गरज असणाऱ्या विकासकामांनाच प्राधान्य देऊन गावचा सर्वांगीण विकास साधत आहोत आणि भविष्यात देखील आमचा हाच प्रयत्न राहील. गावातील शिक्षण, पाणी, आरोग्य, रस्ते अश्या आवश्यक असणाऱ्या7 तथा ग्रामस्थांनी सुचवलेल्या कामांची नोंद घेऊनच गावचा नियोजनबद्ध विकास करण्याचा आमचा मानस आहे. आमचे नेते सदाभाऊ खोत यांचे कोकणावर विशेष प्रेम असल्याने आपल्याकडील विकास कामांसाठी ते भरघोस असा निधी देत असतात. त्याबद्दल गावाकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
सदर विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.