(संगमेश्वर / प्रतिनिधी)
दोन दिवसांपूर्वी संगमेश्वर येथील सोनवी पुलावर एक भीषण अपघात झाला होता. कारने थेट पुलाचा कठडा तोडून पंचवीस ते तीस फूट खोली खोल नदीत कोसळली. यानंतर आता ठेकेदार कंपनीला जाग आली असून ज्या भागातून कार थेट नदी पात्रात कोसळली होती त्या ठिकाणी स्टीलचे पत्रे उभारण्यात आले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील शंभरी ओलांडली तरीही वाढत्या रहदारीचा भार सोसणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला सोनवी नदीवरील पुल दुरूस्तीअभावी धोकादायक स्थितीत उभा आहे. पुलाच्या दोन्हीं बाजूचे कठडे ढासळलेले आहेत. या पुलाबाबत दिवसेंदिवस नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कारचा या पुलावरून थेट नदी पात्रात कोसळून अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण सुदैवाने बचावले आहेत. पाचही जणांना गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र अपघातातील कार ज्यां ठिकाणावरून खाली कोसळली होती. त्या भागांत मजबूत कठडा न उभारता स्टीलचे पत्रे उभारलेले दिसून येत आहेत. ठेकेदाराला अपघातानंतर हे सुचलेले शहाणपण कोणते म्हणावे? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या स्टीलच्या पत्र्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे.
सोनवी पूल हा 62 मीटर लांबीचा असून त्याची रंदी कमी असल्याने एकाचवेळी एखादे अवजड वाहन जाऊ शकत नाही. रिक्षाही सहजरित्या जावू शकत नाही. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाच्या बाजूलाच चौपदरीकरण काम सुरु असल्याने नव्या प्रोजेक्टनुसार सोनवी नदीवरही मोठा पूल उभारण्यात येत आहे. परंतु या पुलावरील संरक्षण कठडे तुटलेले असताना देखील डागडुजी संबधीत विभागाने करणे आवश्यक होते. मात्र वारंवार सांगूनही चांगले संरक्षण कठडे महामार्ग प्राधिकरण विभागाला उभारता आलेले नाहीत. अशा मनमानी कारभारामुळे व दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याने महामार्ग ठेकेदार कंपनीवर व महामार्गाच्या प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला जात आहे.
वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. मात्र पुरेशी खबरदारी न घेता काम करण्यात येत असल्याचा आरोप वाहनचालकांमधुन आणि पादचाऱ्यांकडून केला जात आहे. या सुरु असलेल्या कामामुळे सोनवी पुलावर दिवस-रात्र प्रचंड वाहतूक कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागतो.
नव्या पुलाच्या कामामुळे जुन्या पुलाकडे दुर्लक्ष
या ब्रिटिशकालीन पुलावरून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. लोखंडी सळ्यांची जोड दिलेले सिमेंटचे कठडे ही एकाबाजूने ढासळत आहेत. तर पुलाचे लोंखडी रेलिंगही तुटलेल्या व पडलेल्या अवस्थेत आहे. दुसरीकडे पुलावर लहान-मोठे खड्डे पडलेले आहेत. नवीन पुलांच्या कामांमुळे जुन्या पुलांकडे दुर्लक्ष होत असल्याने पूल अधिकच धोकादायक झाला आहे.