(मुंबई)
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंबईतून एका हेरगिरी करणाऱ्याला अटक केली आहे. माझगाव डॉकयार्डची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून एकाला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानला दिलेल्या माहितीमध्ये माझगाव डॉकयार्डमध्ये तयार करण्यात येणाऱ्या युद्धनौका आणि इतर जहाजांची माहिती दिली असल्याचा संशय आहे. या प्रकरणी मुंबई एटीएसने एकाला अटक केली आहे. नवी मुंबई एटीएसनं ही कारवाई केली असून आरोपीची कसून चौकशी केली जात असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एटीएसला माझगाव डॉकयार्डमधील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना पुरवली जात असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी माझगाव डॉकयार्डमधील एका ३१ वर्षांच्या स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला अटक केलीय. हनी ट्रॅपमध्ये अडकल्याने स्ट्रक्चरल फॅब्रीकेटरने ही माहिती पुरवली असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आरोपी कल्पेश बैकरसह त्याच्या संपर्कात असलेल्या इतरांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई युनिट करत आहे.
३१ वर्षीय तरुण गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एका महिलेसोबत चॅटिंग करत होता. त्या महिलेला काही संवेदनशील माहिती त्याने पुरवल्याचा आरोप आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवदेनशील असलेली माहिती पैशांच्या बदल्यात दिल्याचा ठपका अटक केलेल्या ३१ वर्षीय तरुणावर आहे.
आरोपीच्या चौकशीदरम्यान काही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानं सांगितलं की, नोव्हेंबर 2021 ते मे 2023 या कालावधीत त्याची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपद्वारे एका पाकिस्तानी तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर सदरील तरुणाच्या सूचनेनुसार तो तिला संवेदनशील माहिती देऊ लागला. आरोपीनं या तरुणीला भारत सरकारनं प्रतिबंधीत केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरविली असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1