स्वतःसह आपल्या दोन चिमुरड्या मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या करणाऱ्या मातेसह तिच्या दोन्ही मुलांना वाचवत कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रेश्मा राजू वडर यांनी अनमोल कामगिरी केली आहे. ही घटना 2 मे रोजी सांयकाळी 7 वाजता बांधकरवाडी येथील दत्तमंदिर नजीक च्या विहिरीवर घडली.
रेश्मा राजू वडर या कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागातील आरेखक राजू वडर यांच्या पत्नी आहेत. 2 मे रोजी रेश्मा वडर ह्या मेडिकल स्टोअर्स मधून गोळ्या आणण्यासाठी गेल्या होत्या. गोळ्या घेऊन येत असताना त्यांना दत्तमंदिर नजीक च्या विहिरीवर मुलांचा रडण्याचा आवाज आला. कुतूहल म्हणून रेश्मा यांनी विहिरीच्या दिशेने जात पाहिले असता त्यांना एक महिला दोन मुलांसह विहिरीच्या कठड्यावर चढून विहिरीत उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेली दिसली.
विहिरीत उडी मारून स्वतःसह दोन्ही मुलांचा जीव देण्याच्या प्रयत्नात ती महिला असतानाच रेश्मा वडर यांनी प्रसंगावधान राखून लागलीच धावत जाऊन अंदाजे 4 वर्षीय मुलाला आणि 6 वर्षीय मुलीला खाली उतरवले. त्या महिलेलाही तातडीने विहिरीवरुन खाली उतरवले. त्यानंतर त्या महिलेची समजूत घातली.अधिक चौकशी करता आत्महत्येचा प्रयत्न करणारी सदर महिला जानवली गावातील असल्याचे समजले. बांधकरवाडी येथील आपल्या नातेवाईकांकडे ती आली होती. कौटुंबिक वादातून हे अघोरी पाऊल तिने उचलले होते.
मात्र सुदैवाने रेश्मा वडर यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मातेसह दोन्ही चिमुकल्यांचे प्राण वाचले .जर दुर्घटना घडली असती तर त्या महिला आणि मुलांसह रेश्माही विहिरीत पडल्या असत्या. रेश्मा वडर यांना स्वतःला पोहताही येत नाही. तरीही रेश्मा वडर यांनी धाडस करून त्या महिलेसह दोन्ही चिमुकल्यांचे प्राण वाचवले. आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता त्या महिलेसह दोन मुलांचा जीव वाचवणाऱ्या रेश्मा राजू वडर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.