(राजापूर)
राजापूर तालुक्यातील जैतापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विद्यमान चेअरमन यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेली आणि विद्यमान चेअरमन शर्फुद्दीन काझी यांसह अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ही प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन शर्फुद्दीन काझी यांच्या पॅनेलने अकरा जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे.
सर्वांनीच अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत विद्यमान पॅनलसह अन्य दोन पॅनल रिंगणात होते. तेरा संचालक पदासाठी झालेल्या या निवडणुकीत शिवसहकार पॅनल चा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला होता, तर बारा संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन शर्फुद्दीन काझी यांचे यांच्या पॅनलचे अकरा तर अन्य पॅनल चा एक उमेदवार निवडून आला विद्यमान चेअरमन व संचालकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे आणि बिनविरोध व्हावी यासाठी कोणते प्रयत्न झाल्याने सोसायटीला निवडणुकीला सामोरे जावे लागले होते. निवडणूक बिनविरोध व्हावी असे अनेक जणांचे म्हणणे होते. मात्र विद्यमान संचालकांकडून कोणताच पुढाकार घेतला गेल्याने सोसायटीवर निवडणुकीचा भार पडला असल्याचे अन्य दोन पॅनलचे म्हणणे आहे .
या निवडणुकीसाठी मुंबई व अन्य ठिकाणाहून जवळपास 25 ते 30 सभासदांना आणण्यात आले होते आणि हीच मते निर्णायक ठरून विद्यमान पॅनल ला सोसायटी आपल्याकडे ठेवण्यात यश मिळाल्याचे बोलले जात आहे .
या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मते विद्यमान चेअरमन शर्फुद्दीन काझी यांना मिळाली असून त्यांच्यासमवेत प्रदीप मांजरेकर, अशोक करगुटकर, सखाराम करगुटकर, संजय करगुटकर रिझवान काझी, महेंद्र मांजरेकर, सूनिता गुरव, प्रियांका गुरव सुभाष पवार आणि दुसऱ्या पॅनलचे महेश करगुटकर हे उमेदवार विजयी झाले आहेत तर महेंद्र गवाणकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.अन्य दोन पॅनलने विद्यमान चेअरमन व संचालकांच्या नाकी दम आणल्याचे चर्चा मात्र परिसरात सुरु आहे स्थानिक लोकांना निवडणुकी परिवर्तन व्हावे अशी अपेक्षा होती. मात्र नोकरीधंद्याच्या व कामाच्या निमित्ताने कायम बाहेर राहणाऱ्या लोकांना केवळ निवडणुकीच्या निमित्ताने आणून सोसायटीवर ताबा राखण्यात विद्यमान चेअरमन व संचालक यांना यश आल्याची चर्चा मात्र सुरू आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री खडसे यांनी काम पाहिले. नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी निवडणूक केंद्राबाहेर अनेकांनी गर्दी केली होती.