(लांजा)
लांजा तालुक्यातील भांबेड- वाटूळ मार्गावर रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या पाच जणांना येथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना रविवारी रात्री घडली. या घटनेत गुरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७ लाख रुपये किंमतीची महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप, तसेच एकवीस हजार रुपये किमतीची तीन गाई आणि तीन वासरे असे एकूण 7 लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रात्रीच्या वेळी अवैध रित्या गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भांबेड येथील ग्रामस्थ या प्रकारावर लक्ष ठेऊन होते. रात्री १० वा.च्या सुमारास बोलेरो मॅक्स पिकअप चारचाकी गाडी ग्रामस्थांनी थांबवली असता या गाडीच्या पाठीमागील हौद्यामध्ये दाटीवाटीने उभी करून ठेवलेली गुरे आढळून आली. त्यानंतर ग्रामस्थांनी या सर्वांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
विनापरवाना गुरांची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अल्लाउद्दीन इब्राहीम लांजेकर, सिराज महंम्मद नाचरे (रा. कोळपे जमातवाडी तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग), मुस्ताक बाबालाल लांजेकर, यशवंत शामराव कांबळे (लांजा, रिंगणे) आणि प्रभानवल्ली अशी या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्यावर प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१),(घ)(ड)(च) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, मोटार वाहन कायदा कलम ६६/१९२ सह भादवि कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल दिनेश आखाडे करत आहेत.