(रत्नागिरी/यासीन पटेल)
निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण पर्यटनासाठी जगप्रसिद्ध आहे. आता याच रत्नागिरीचे सुपुत्र कॅप्टन फैरोज अनवर माजगावकर मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीचा झेंडा सातासमुद्रापार रोवण्यास सज्ज झाले आहेत. मर्चंट नेव्ही मध्ये 22 वर्षे ते कार्यरत होते. त्यांची पहिलीच निर्मिती असलेला ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा मराठी चित्रपट मराठीसह इंग्रजी, स्पॅनिश अशा जगभरातील विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे.
कॅप्टन फैरोज अनवर माजगावकर हे मूळचे रत्नागिरीचे आहेत, त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीलाच झालेले आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोशिएशन, रत्नागिरी जिल्हा सुपर सेव्हन क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. माजगावकर यांना गायन, मॉडेलिंगचा छंद आहे, महाविद्यालयात असताना अभिनयाची आवड होती मात्र तत्कालीन परिस्थितीमुळे त्यांना पूर्णवेळ अभिनयाकडे वळता आले नाही. असे असले तरी ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या आपल्या पहिल्या चित्रपट निर्मितीमध्ये ते आणि त्यांचा मुलगा अदीन माजगावकर महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
आपल्या पहिल्या चित्रपट निर्मितीबद्दल बोलताना कॅप्टन फैरोज अनवर माजगावकर म्हणाले, मी मर्चंट नेव्ही मध्ये वीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे. कॅप्टन या सर्वोच्च पदावर काम केल्या नंतर काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होतो. यामुळे नवी इनिंग सुरू करताना चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. मी कामाच्या निमित्ताने जगभ्रमंती केली आहे, माझा मित्र परिवार जगभर पसरलेला आहे, यामुळे आपल्या मराठी मातीतला सिनेमा मला त्यांच्या पर्यंत न्यायचा आहे. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चा विषय एकदम हटके आहे. हा विषय फक्त महाराष्ट्र नाही तर जागतिक पातळीवरील प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवा अशी आमची इच्छा आहे. यामुळे आमचा ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा चित्रपट मराठी, इंग्रजी, जगातील दुसऱ्या क्रमांकाची बोली भाषा असलेल्या स्पॅनिश मध्ये तसेच बांग्लादेशी भाषेतही करण्याचा आम्ही निर्णय घेतला. माझी गोल्डन स्ट्राईप्स एन्टरटेन्मेंट कंपनी आणि कियान फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट हे चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहयोगी निर्माते अनन्या फिल्म्स आहेत. लेखक, दिग्दर्शक अजित दिलीप पाटील आणि कार्यकारी निर्माते सोमनाथ गिरी आहेत.
‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाचे उत्कंठावर्धक टीझर पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठीतील बड्या स्टार्सचा समावेश आहे. तसेच या चित्रपटाच्या टेक्निकल टीममध्ये बॉलीवूड व इजिप्शियन फिल्म इंडस्ट्री मधील लोकांचा समावेश आहे. चित्रपटाचे शूटिंग देशातील विविध शहरांसह कोकणात होणार असल्याचेही कॅप्टन माजगावकर यांनी नमूद केले.