(चिपळूण)
टाकारहित ऑपरेशन म्हणजेच ब्रोन्कोस्कोपी करून कान, नाक, घसा तज्ज्ञांना श्वास नलिकेत अडकलेले सीमकार्डचे पिन काढण्यात यश आले. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय चमूने ही अवघड शस्त्रक्रिया करून एका २३ वर्षीय महिलेला जणू जीवदानच दिले आहे.
रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने आपल्या मोबाइलचे सीम बदलताना सीमकार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवली, चुकून त्या महिलेने ती पिन गिळली. त्यावेळेस श्वासोच्छवासाला तिला किंवा गिळायला काही त्रास होत नव्हता म्हणून ती रात्री डॉक्टरांकडे न जाता घरीच राहिली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तिने रत्नागिरी येथील एका सर्जन डॉक्टरांना दाखविले. त्यांनी अन्ननलिकेची स्कोपी केली. मात्र, त्यांना ती पिन दिसली नाही. नंतर त्यांनी छातीचा एक्स-रे व सिटी स्कॅन केले असता, उजव्या बाजूच्या श्वासनलिकेत ही पिन दिसली. त्यांनी त्या महिलेला वालावलकर जाण्यास सांगितले. रुग्णालयात वालावलकर रुग्णालयातील ईएनटी सर्जन डॉ. राजीव केणी यांनी तपासून तातडीने शस्त्रक्रिया करून पिन श्वास नलिकेतून काढण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर रात्री ब्रोन्कोस्कोपी करून उजव्या फुफ्फुसाच्या श्वास नलिकेतील सीम कार्डची पिन बाहेर काढली. अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया सहजरीत्या रुग्णांच्या झाल्यामुळे नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले. डॉ. लीना ठाकूर, डॉ. गौरव बावीसकर तसेच वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांनी ही अवघड शस्त्रक्रिया पार पाडली.