(संगमेश्वर /एजाज पटेल)
देवरुख आगाराच्या भोंगळ कारभार विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक; संतप्त शिवसैनिकांसह मविआची देवरूख आगारात धडक देत आगारातील एसटी फेऱ्या रद्द करून त्या मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी पाठवण्यात आल्यामुळे आज बुधवारीअनेक प्रवाशांचे हाल झाले. देवरुख आगाराच्या या भोंगळ कारभार विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून तालुका प्रमुख बंड्या बोरुकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शिवसैनकांनी देवरूख आगारात धडक देऊन जादा बसफेऱ्या चालू करून घेतल्या.
आज रत्नागिरी येथे होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजने साठी देवरुख आगारातून कमीत कमी चाळीस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यामुळे देवरुख परिसरातील ग्रामीण भागातल्या अनेक बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. याची प्रवाशांना कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. यामुळे अनेक विद्यार्थी व वृद्ध प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागात रस्त्यावर तासनतास उभे होते. हा सर्व प्रकार लक्षात येताच संतप्त शिवसैनिकांनी देवरूख आगायत धडक दिली.
तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर यांनी आगारव्यवस्थापक यांना खडेबोल सुनावले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बारक्याशेठ बने, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, शहरप्रमुख दादा शिंदे, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, युवासेना तालुका प्रमुख तेजस शिंदे, युवासेना उपतालुका प्रमुख तेजस भाटकर, विनीत बेर्डे, बबन बोधले, वैभव जाधव, अमित मोहिरे, रेहान गडकरी, बाबू गोपाळ, व अन्य शिवसैनिक तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.